जालना : कोरोनाचा कहर वाढू लागल्याने जालना जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये व आठवडे बाजार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. जिल्ह्यात कोरोनाने डोकं वर काढल्यानंतर जिल्ह्याधिकाऱ्यांनी यासंदर्भातील आदेश काढला आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध निर्बंध लागू करण्यास सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. तसेच राज्यात सार्वजनिक कार्यक्रम, लग्न समारंभ, खाजगी कार्यक्रमांवरही बंधने घालण्यात आली आहेत.
Maharashtra | Jalna Dist Collector has ordered to shut schools, colleges, coaching classes & weekly markets in the district till Mar31, due to current COVID19 situation. Rapid Antigen test of all vegetable, fruit,newspaper vendors to be conducted periodically: Jalna SP V.Deshmukh
— ANI (@ANI) February 24, 2021
जालना जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत अंशत: लॉकडाऊन राहणार आहे. तसेच भाजीपाला, फळे विक्रेते, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्याही केल्या जाणार असल्याची माहिती जालन्याचे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांनी दिली.
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांनी तंबी दिल्यानंतर कर्नाटकची सीमा खुली
राज्यात ठिकठिकाणी नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतरांना बाहेर फिरता येणार नाही. पुण्यासह औरंगाबाद, नाशिक, सातारा व अन्य काही शहरांमध्ये याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. तसेच पुण्यामध्ये पुढील आठवडाभर शाळा व महाविद्यालयेही बंद राहणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी नागरिकांना आठवडाभराची मुदत दिली आहे. या काळात नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे योग्य पालन न केल्यास लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मास्कचा वापर, सहा फूटाचे अंतर आदी नियमांचे पालन करावे. ''मी जबाबदार'' म्हणत कोरोनाशी दोन हात करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
Edited By Rajanand More

