मुख्यमंत्र्यांनी तंबी दिल्यानंतर अखेर कर्नाटकची सीमा झाली खुली! - after kerala chief minister warning karnataka opens border again | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

मुख्यमंत्र्यांनी तंबी दिल्यानंतर अखेर कर्नाटकची सीमा झाली खुली!

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने कर्नाटकने शेजारील केरळ व महाराष्ट्रातील नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घातले आहेत. 

तिरुअनंतपुरम : देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारने आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय केरळ आणि महाराष्ट्रातील नागरिकांना राज्यात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला होता. यावर केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी कर्नाटकला तंबी दिली होती. अखेर कर्नाटकने केरळमधील नागरिकांच्या प्रवेशावरील निर्बंध हटवले आहेत. 

महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश, पंजाब आणि छत्तीसगडमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. यामुळे सर्वच राज्यांनी खबरदारी घेण्यास सुरवात केली आहे. यावर कडी करत कर्नाटकचे आरटी-पीसीआर चाचणीने निगेटिव्ह प्रमाणपत्र असल्याशिवाय  केरळ व महाराष्ट्रातील नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे. यावर केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. 

हेही वाचा : कर्नाटकनंतर गुजरात अन् मध्य प्रदेशकडून महाराष्ट्राची नाकाबंदी

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कोविड नियमावलीच्या विरोधात कर्नाटक सरकारचा निर्णय असल्याचे विजयन यांनी म्हटले होते. या प्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली होती. कोणतेही राज्य आंतरराज्य प्रवासावर निर्बंध घालू शकत नाही, अशी नियमावली केंद्र सरकारनेच जाहीर केली आहे. आता कर्नाटकातील सरकारकडून याचा भंग सुरू आहे, अशी टीकाही विजयन यांनी केली होती. 

अखेर कर्नाटक सरकारने नमती भूमिका घेऊन केरळमधील नागरिकांच्या प्रवेशावर घातलेले निर्बंध हटवले आहेत. आरटी-पीसीआर चाचण्यांची प्रमाणपत्रे तातडीने सादर करणे सर्वांनाच शक्य होणार नाही, यामुळे निर्बंध मागे घेण्यात येत आहेत, असे कारण कर्नाटकने दिले आहे. ही सवलत दोन दिवसांसाठी राहील, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. 

कर्नाटकचे आरोग्यमंत्री  डॉ.के. सुधाकर नुकतेच म्हणाले होते की, महाराष्ट्र आणि केरळशी कर्नाटकच्या सीमा जोडलेल्या आहेत. महाराष्ट्रात रोज सरासरी 5 ते 6 हजार कोरोना रुग्ण सापडत आहेत. याचवेळी केरळमध्ये रोज सरासरी 4 ते 5 हजार कोरोना रुग्ण सापडत आहेत. यामुळे या दोन्ही राज्यांतील नागरिकांना कर्नाटकमध्ये प्रवेश करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय महाराष्ट्रासह केरळमधील नागरिकांना कर्नाटकमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. 

Edited Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख