पटोलेंचे ते वक्तव्य काँग्रेससाठी विनाशकारी! गांधी परिवाराकडून नाराजी... - Nana Patoles comment on amitabh bachhan is anti democracy says tushar gandhi | Politics Marathi News - Sarkarnama

पटोलेंचे ते वक्तव्य काँग्रेससाठी विनाशकारी! गांधी परिवाराकडून नाराजी...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार याचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार याचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. त्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांनीही नाना पटोले यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदविला आहे.

पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर आकाशाला भिडले आहेत. देशात जेव्हा मनमोहन सिंह यांचं सरकार होतं, त्यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून सातत्याने टिका करायचे. आता नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये महागाईने जनता हवालदिल झाली असताना त्यांची टिव टिव का बंद झाली, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले दोन दिवसांपूर्वी केला होता. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे सिनेमे किंवा त्याचे शूटींग आता आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

हेही वाचा : अमित शहांना ममता बॅनर्जी यांचे खुले आव्हान...

यावर बोलताना तुषार गांधी म्हणाले, ''नाना पटोले यांचे वक्तव्य म्हणजे निंदनीय आहे. त्याचा तीव्र शब्दांत निषेध करायला हवा. जर काँग्रेस फॅसिस्टांप्रमाणे इतक्या खालच्या पातळीवर जात असेल तर हे काँग्रेससाठी विनाशकारी ठरेल. यामुळे लोकशाहीलाही धोका निर्माण होईल. कोणत्याही लोकशाहीवादी लोकांनी अशा तुघलकी भूमिकेवर गप्प बसू नये. मी तर शांत बसणार नाही,'' अशा कठोर शब्दांत त्यांनी नाना पटोले यांच्या वक्तव्याला विरोध केला.

दरम्यान, शिवसेनेचे नेते व खासदार अरविंद सावंत यांनी नाना पटोले यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.  नाना पटोलेंमध्ये शिवसेनेचे संस्कार ( आक्रमकता) उतरले आहेत, असे ते म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पटोले यांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे.

"नाना पटोले आताच प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्यावर टीका करून त्यांना माध्यमांचे लक्ष आपल्याकडे वळवायचे आहे. काही दिवस प्रसिध्दीच्या झोतात राहायचे आहे. राज्यात त्यांची सत्ता असली म्हणजे ते मालक होत नाही," असे फडणवीस म्हणाले होते.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख