पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या आमदाराची राष्ट्रवादीतून हकालपट्टी... - Expulsion of MLA For anti party activities by keral NCP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या आमदाराची राष्ट्रवादीतून हकालपट्टी...

वृत्तसंस्था
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

केरळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मणी सी. कप्पन हे काही दिवसांपासून पक्षावर नाराज होते.

तिरुअनंतपुरम : केरळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मणी सी. कप्पन हे काही दिवसांपासून पक्षावर नाराज होते. त्यांनी राज्यातील डाव्या आघाडी सरकारची साथ सोडून काँग्रेस आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तेथील अन्य पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी आघाडीमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही पक्षविरोधी निर्णय घेतल्याने पक्षाने कप्पन यांची आज हकालपट्टी केली.

कप्पन हे सध्या कोट्टायम जिल्ह्यातील पाला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.  २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे तीन आमदार निवडून आले आहेत. एप्रिल महिन्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत डाव्यांच्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटने (एलडीएफ) पाला मतदारसंघ सोडण्यास नकार दिलेला आहे. यामुळे कप्पन नाराज आहेत. यातून त्यांनी काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटमध्ये (यू़डीएफ) जाण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या.

एलडीएफने आम्हाला चार जागा देण्याचे कबूल केल्याने आम्ही आघाडी कायम ठेवली. मात्र, मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी आम्हाला पाला मतदारसंघाऐवजी कुट्टनाड मतदारसंघ देण्यात येईल, असे म्हटले आहे. आता याबाबतचा निर्णय आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व घेईल, असे कप्पन म्हणाले होते. तसेच त्यांनी पक्षाला रविवारपर्यंतची मुदत दिली होती. पण पक्षाने त्यांचे म्हणणे मान्य न केल्याने त्यांनी 'यू़डीएफ'मध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

कप्पन यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांनी पक्षातून हकालपट्टी केल्याचे जाहीर केले. पक्षाचे सचिव एस. आर. कोहली यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनामध्ये पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची हकालपट्टी केल्याचे म्हटले आहे. 

हेही वाचा : बंगालमध्ये भाजपला धक्का, हिंदुत्ववादी संघटना राजकीय आखाड्यात...

कप्पन यांची भूमिका काय होती?
हा मुद्दा केवळ एका जागेचा नाही तर विश्वासाचा आहे. पाला मतदारसंघातील यशानंतर एलडीएफची विजयी घोडदौड सुरू झाली. माझ्या मनात मुख्यमंत्री विजयन यांच्याबद्दल आदराची भावना आहे. त्यांनी येथील विकास प्रकल्पांना गती दिली आहे, असे कप्पन यांचे म्हणणे होते.  

शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्याशी या मुदद्यावर चर्चा करण्यास सांगितले होते. परंतु विजयन यांनी पाला मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. 

एलडीएफने कुट्टनाड मतदारसंघ सोडण्याची तयारी केली असून, या मतदारसंघाचे आमदार थॉमस चंडी यांचे निधन झाले आहे. दरम्यान, पाला मतदारसंघावर यूडीएफचे वर्चस्व राहिले आहे. या ठिकाणी माजी अर्थमंत्री के.एम.मणी हे प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर मणी सी. कप्पन हे यूडीएफच्या उमेदवाराचा पराभव करत निवडून आले होते. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख