कोलकता : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या भाजपला धक्का बसला आहे. जवळपास ३२ वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (आरएसएस) काम केलेल्या प्रचारकाने स्थापन केलेल्या हिंदुत्ववादी संघटनेने राजकारणात उडी घेतली आहे. त्यांनी 'जन समहति' या राजकीय पक्षाची घोषणा केली असून भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. हा पक्ष बंगालमधील १७० जागांवर उमेदवार उभे करणार आहे.
आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगले तापले आहे. भाजपने आगामी विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली असून तृणमूल काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे केले आहे. तृणमूलचे डझनभर आमदार फोडून भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जेरीस आणले आहे. पण पुढील काळात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : आंबेडकर महासभेकडून राम मंदिरासाठी चांदीची वीट दान...
मागील निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिलेल्या हिंदू समहति या हिंदुत्ववादी संघटनेने जन समहति या नावाने राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. हिंदू समहति संघटना स्थापन करणारे तपन घोष हे पश्चिम बंगालमध्ये आरएसएस प्रचारक म्हणून काम करत होते. ते १९७५ ते २००७ या कालावधीत बंगालमध्ये काम करत होते. पण त्यानंतर संघासोबत झालेल्या वैचारिक मतभेदांमुळे त्यांनी १४ फेब्रुवारी २००८ मध्ये हिंदू समहित या संघटनेची स्थापना केली.
भक्तांनाही आता मोदी नकोसे वाटतात... https://t.co/tL0YTyvjic #Governor #NanaPatole #Assembly #NarendraModi #Congress #BJP #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNews
— Sarkarnama (@SarkarnamaNews) February 15, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच बंगालमधील एका कार्यक्रमामध्ये 'राम कार्ड'चा उल्लेख केला होता. तसेच गृहमंत्री अमित शहा यांनीही ममता बॅनर्जी या निवडणूक संपेपर्यंत जय श्रीराम म्हणतील, असे म्हटले होते. त्यामुळे भाजपकडून आगामी निवडणुकीत हिंदुत्ववादी मतांवर लक्ष केंद्रीत केल्याची चर्चा आहे. आता या मतांमध्येच फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बंगालमधील १७० जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष देबतनु भट्टाचार्य यांनी केली आहे. ते म्हणाले, बंगालमध्ये आमचा पक्ष कुणासोबतही आघाडी करणार नाही. भाजप हिंदूंना फसवत आहे. त्यांना बंगालमध्ये केवळ सत्ता हवी आहे. हिंदुंच्या हक्कांचे संरक्षण करायचे नाही. आमच्या पक्षाचा जनाधार चांगला आहे. त्यामुळे निवडणुकीत निश्चित यश मिळेल, अशी आशा आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बंगालमध्ये २०१७ मध्ये झालेल्या जातीय दंगलीदरम्यान हिंदू समहति संघटनेचे नाव पुढे आले होते. बसरिहाट येथील दंगलीतील आरोपी असलेल्या दोघांना कायदेशीर मदत करण्याची घोषणा घोष यांनी केली होती. तसेच त्यांनी या दंगलीवर कॅलेंडरही काढले होते. याचवर्षी संघटनेने एका मुस्लिम कुटूंबाचे धर्मपरिवर्तन केले होते.
Edited By Rajanand More

