अदर पूनावालांना धमक्या अन् उच्च न्यायालयाकडून ठाकरे सरकारला आदेश

भारतातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांपैकी काही जणांकडून धमक्या येत आहेत, असा दावा पूनावाला यांनी केला होता.
Ensure Adar Poonawallas safty High Court directions to State Government
Ensure Adar Poonawallas safty High Court directions to State Government

मुंबई : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी देशातील बड्या व्यक्तींकडून धमक्या मिळत असल्याचा गौप्यस्फोट काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयानेही त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत ठाकरे सरकारला सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले आहे. (Ensure Adar Poonawallas safty High Court directions to State Government)  

अदर पूनावाला यांनी काही दिवसांपूर्वी ब्रिटनमधील 'द टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीवरुन मोठा गदारोळ निर्माण झाला होता. आहे. पूनावाला यांनी कुंभमेळा आणि भारतातील निवडणुकांबाबत बोलण्यास या मुलाखतीत नकार दिला होता. हे दोन्ही विषय संवेदनशील आहेत आणि धमक्या येत असल्याने यावर बोलणार नाही. मी खरे बोललो तर माझे शिर धडावेगळे होईल, असे पूनावालांनी म्हटले होते. देशातील परिस्थिती एवढी बिघडेल, असे देवालाही वाटले नसेल, असेही त्यांनी म्हटले होते. देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला अशी टीका सुरू आहे. याविषयी पूनावालांना विचारणा करण्यात आली होती. 

या मुलाखतीचा संदर्भ देत अॅड. दत्ता माने यांनी मागील महिन्यात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे पूनावाला यांनी झेड सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाले. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पूनावाला हे देशासाठी मोठं काम करत असून महाराष्ट्र सरकारने त्यांच्या सुरक्षेबाबत दक्षता घ्यावी, असे आदेश दिले. राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट त्यांच्याशी बोलून भारतात परतल्यानंतर त्यांच्या सुरक्षेची हमी द्यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. 

दरम्यान, केंद्र सरकारने पूनावाला यांना यापूर्वीच वाय दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवली आहे.  तसेच परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्याबाबत विचार केला जाईल, असे राज्य सरकारच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले. 

काय म्हणाले होते पूनावाला?

मुलाखतीमध्ये पूनावाला म्हणाले की, भारतातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांपैकी काही जणांकडून धमक्या येत आहेत. यात काही राज्यांचे मुख्यमंत्री, काही उद्योग समुहांच्या प्रमुखांचा समावेश आहे. हे सर्व सीरमच्या एस्ट्राझेनेका म्हणजेच कोविशिल्ड लसीचा तातडीने पुरवठा मागत आहेत. यांना धमकी म्हणणंही कमी ठरेल. त्यांच्या  आम्हाला लसपुरवठा करणे योग्य ठरणार नाही, अशी ही मंडळी सांगत असतात. सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. लशीचा पुरवठा मागणीप्रमाणे होत नसल्याने सारेच पूनावाला यांच्यावर दबाव आणत आहेत. 

या मुलाखतीत पूनवालांनी म्हटले आहे की, सिरम दुसऱ्या देशात आता लस उत्पादन प्रकल्प सुरू करणार आहे. याबाबतची घोषणा पुढील काही दिवसांत होईल. माझ्या खांद्यावर सध्या मोठे ओझे आहे. भारतातील काही शक्तिशाली व्यक्ती मला धमक्या देत आहेत. यामुळे पत्नी आणि मुलांसमवेत लंडनमध्ये आलो आहे. कोव्हिशिल्ड लशीसाठी अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उद्योगपती मला धमकीचे कॉल करीत आहेत, असे पूनावाला यांनी सांगितलं होते.  

सर्व जबाबदारी माझ्याच खांद्यावर असल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे. सुरवातीला आपण मोठे काम करत असल्याची भावना होती. अभिमान वाटत होता. मात्र अश्रू आणि घाम गाळूनही सिरमबद्दल नकारात्मक पद्धतीने बोलले जात असल्याची खंत  त्यांनी व्यक्त केली. सिरमच्या कामाचे कौतुक आणि पाठिंबा मिळायला हवा होता. प्रत्यक्षात उलटेच घडत असून आम्हालाच दोष देऊन खलनायक ठरविले जात असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. मी नफा मिळविण्यासाठी काही चुकीचे केलेले नाही. इतिहासच माझ्या कामाचे योग्य मूल्यमापन करेल, अशी भावना त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केली.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com