पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री ठाकरेंचं ऐकणार का? दिल्लीतील भेटीकडं महाराष्ट्राचं लक्ष - CM Uddhav Thackeray will meet PM Modi to discuss Maratha reservation issue | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री ठाकरेंचं ऐकणार का? दिल्लीतील भेटीकडं महाराष्ट्राचं लक्ष

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 8 जून 2021

महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. प्रामुख्याने याच विषयावर ठाकरे सरकारकडून मोदींना साकडं घातलं जाणार आहे.

मुंबई : मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, तोक्ते वादळाने झालेले नुकसान, लसीकरण आदी महत्वाच्या मुद्यांसाठी आज मुख्यमत्री उद्धव ठाकरे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हेही उपस्थित असतील. तिघेही दिल्लीत दाखल झाले असून 11 वाजता ही भेट होणार आहे. (CM Uddhav Thackeray will meet PM Modi to discuss Maratha reservation issue)

महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. प्रामुख्याने याच विषयावर ठाकरे सरकारकडून मोदींना साकडं घातलं जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 102 व्या घटनादुरूस्तीचा आधार घेत मराठा आरक्षण कायदा रद्द केल्याचे राज्य सरकारकडून वारंवार सांगितले जात आहे. आता केंद्र सरकारच आरक्षण देऊ शकते, अशी भूमिका ठाकरे यांनीही मांडली आहे. आरक्षण रद्द झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधानांना भेटणार असल्याचे त्यावेळी जाहीर केले होते. त्यानुसार आजची भेट महत्वाची मानली जात आहे.

हेही वाचा : पराभवातून धडा घ्या; आगामी विधानसभा निवडणुकांआधी मोदींचा मंत्र

भाजप सरकारच्या काळात आरक्षण कायदा मंजूर करण्यात आला होता. उच्च न्यायालयानेही हा कायदा मान्य केला. पण सर्वोच्च न्यायालयात कायदा टिकला नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने योग्यपध्दतीने बाजू न मांडल्याने कायदा रद्द झाल्याचा आरोप केला आहे. तर ठाकरे सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. तसेच कायदा 'फुलप्रुफ' नव्हता, असं विधानही ठाकरे यांनी केलं होतं. त्यामुळं सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद वाढला. 

त्यातच मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या 16 जूनपासून त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. असे झाल्यास कोरोना काळात महाराष्ट्र सरकारची डोकेदुखी वाढणार आहे. त्याआधीच मराठा आरक्षणाच्या तिढ्यावर काहीतरी मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळं आजची पंतप्रधानांची भेट महत्वाची मानली जात आहे. या भेटीत मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार का?, पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री ठाकरे यांचं ऐकणार का?, याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला आहे. 

त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षणावरून विरोधकांनी रान पेटवण्यास सुरूवात केली आहे. स्थानिक स्वरात संस्थांमधील ओबीसींचे 50 टक्क्यांहून अधिक होणारे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे ओबीसी समाजात नाराजी आहे. तोक्ते वादळाने कोकण किनारपट्टीवर कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. त्यामुळं लसीकरणासाठी महाराष्ट्राला झुकतं माप देण्याची मागणी ठाकरे यांच्याकडून पंतप्रधानांना केली जाण्याची शक्यता आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख