पराभवातून धडा घ्या! आगामी विधानसभा निवडणुकांआधी मोदींचा मंत्र - narendra modi discusses strategy of states election with bjp leaders | Politics Marathi News - Sarkarnama

पराभवातून धडा घ्या! आगामी विधानसभा निवडणुकांआधी मोदींचा मंत्र

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 7 जून 2021

उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील विधानसभा निवडणुकांआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या सरचिटणीसांशी संवाद साधला. 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह (Uttar Pradesh) इतर राज्यांतील विधानसभा निवडणुकीआधी (Assembly Election) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भाजपच्या सरचिटणीसांशी संवाद साधला. पश्चिम बंगालसह (West Bengal) इतर राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पराभवातून नवा धडा घेऊन भाजप (BJP) नेत्यांनी पुढचे मार्गक्रमण करावे, असा मंत्र मोदींनी दिला. 

भाजप सरचिटणीसांची दोन दिवसांची विशेष बैठक पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यानंतर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी या सरचिटणीसांसाठी मेजवानी होती. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भूपेंद्र यादव, सी. टी. रवी, दुष्यंत गौतम, डी पुरंदरेश्वरी, अरुण सिंह, दिलीप सैकिया, कैलास विजयवर्गीय, तरूण चुग हे राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष व सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, भाजपच्या कृषी, अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक, महिला, युवक आदी सात आघाड्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित होते. 

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. आगामी उत्तर देश, उत्तराखंड, गोव्यासह पाच राज्यांच्या निवडणुकांची तयारी हा या बैठकीचा मुख्य विषय होता. उत्तर प्रदेशात केंद्रीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा चेहरा समोर करुनच भाजप विधानसभा निवडणुकांना सामोरा जाईल, असे दिसत आहे. 

हेही वाचा : मेड इन इंडिया लस एकच अन् मोदी म्हणाले दोन! 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी यांनी ४ तास सरचिटणीसांशी विविध मुद्यांवर चर्चा केली. मागील निवडणुकांत कुणाचे व कुठे चुकले याची चर्चा करण्यापेक्षा पुढील निवडणुकांत या चुका टाळण्यावर भर द्या. कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी लाखो पक्षकार्यकर्त्यांची फळी उभारणे आणि काँग्रेसमुक्त भारताचे ध्येय भाजप नेत्यांनी विसरू नये, यावर मोदींनी बैठकीत भर दिला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून धडा घेऊन देशभरात सेवा ही संघटन मोहीम राबविण्याचे भाजपने ठरवले आहे. यावरही या बैठकीत मोदींनी काही सूचना केल्या. 

या बैठकीत पश्चिम बंगालसह पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालांची चर्चा झाली. आसाम व पुदुच्चेरी येथे सरकार स्थापन केल्याबद्दल तेथील कार्यकर्त्यांचे नड्डा यांनी अभिनंदन केले. बंगालमध्येही ३ जागांवरून ७७ जागांपर्यंत भाजपने झेप घेतली असून, हा वाढलेला जनाधार दुर्लक्षित करण्यासारखा नसल्याचेही नड्डांनी सांगितले. निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसकडून बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात किमान ३० भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली असून, या हत्यांचा निषेधही बैठकीत करण्यात आला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख