कोरोनाबाधित सर्वाधिक मान्य; पण शेकडो मृतदेह नदीत सोडण्याचे कुकर्म महाराष्ट्राने केले नाही 

भारतात कोरोना कसा वाढला, ते अख्ख्या देशाला आणि आता संपूर्ण जगाला कळून चुकले आहे.
Ashok Chavan criticizes former Chief Minister Devendra Fadnavis
Ashok Chavan criticizes former Chief Minister Devendra Fadnavis

मुंबई : देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित (Corona infected) राज्य असल्याने आपण अधिकाधिक काळजी घेतली पाहिजे, यात दुमत नाही. पण महाराष्ट्रावर (Maharashtra) प्रेम करणारा एक सच्चा मराठी नागरिक म्हणून मला किमान हे समाधान आहे की, माझ्या राज्याने कोरोनाचे रुग्ण आणि मृतांच्या संख्येबाबत कधीही लपवाछपवी केली नाही, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला. (Ashok Chavan criticizes former Chief Minister Devendra Fadnavis)

फडणवीस यांनी राज्य सरकारवर गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृत व्यक्तींची संख्य लपवत असल्याचा आरोप करत आहेत. या संदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर फडणवीस यांनी आज (ता. १५) काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही याबाबत पत्र लिहिले होते. तसेच, मोदी सरकारवर टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्यांबद्दल तक्रारही केली होती. त्याला अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत उत्तर दिले आहे. 

चव्हाण म्हणाले की, शासकीय नोंदीमध्ये मृत व्यक्तींची संख्या बोटावर मोजण्याइतपत ठेवून स्मशानात रात्रंदिवस जळणाऱ्या डझनोगणती चिता लपवण्यासाठी पत्रे ठोकण्याचे पाप महाराष्ट्राने केले नाही. अंत्यसंस्कारासाठी मोठी रांग आहे, लाकडे नाही, जागा नाही; म्हणून शेकडो मृतदेह नदीत बेवारस सोडून देण्याचे कुकर्मही या महाराष्ट्राने केले नाही. 

आरोग्य यंत्रणेतील त्रुटी किंवा ऑक्सिजन, लसींच्या तुटवड्यावर बोलाल, तर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करण्याची संपत्ती जप्त करण्याची धमकी महाराष्ट्राने नागरिकांना कधीही दिली नाही. हे सारे प्रकार ज्या राज्यात घडले, तिथे भारतीय जनता पक्षाचीच सत्ता आहे. त्यामुळे त्या-त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही देवेंद्र फडणवीस यांनी एखादे खरमरीत पत्र लिहिले, तर त्यातून तिथल्या राज्य सरकारांच्या कामात सुधारणा होईल आणि कोरोना रुग्णांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

देशाच्या कोरोना परिस्थिताला जणू महाराष्ट्रच जबाबदार आहे, अशी शंका देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रातून जाणवते. भाजपवरील #महाराष्ट्रद्रोही हा ठपका ते या पत्रातून खरा ठरवत आहेत. त्यांना माझी विनंती आहे की, आपल्या राज्याबद्दल चुकीची प्रतिमा निर्माण करू नका. भारतात कोरोना कसा वाढला, ते अख्ख्या देशाला आणि आता संपूर्ण जगाला कळून चुकले आहे, असा  टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.

ते म्हणाले की, खासदार राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी वेळीच इशारा दिला होता. पण भाजपने त्यांची थट्टा केली. ‘नमस्ते ट्रम्प’ केला. मध्य प्रदेशातील सरकार पाडलं.  यंदा पाच राज्यांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने लाखो लोक गोळा केले. कुंभमेळ्याबाबत निष्काळजीपणा केला. कोरोनाऐवजी निवडणुकीला प्रथम प्राधान्य दिले. त्यामुळे देशातील कोरोनावाढीचा ठपका महाराष्ट्रावर ठेवण्याऐवजी हे खरे पाप कोणाचे, याचे आत्मपरीक्षण देवेंद्र फडणवीस यांनी केले पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com