बबनदादा, संजयमामा कोणाचेही समर्थक नाहीत, ते पवारांचीही दिशाभूल करत आहेत

त्यांची दिशाभूल करून याबाबतच्या निर्णयावर सही घेण्यात आली आहे.
Babandada Shinde, Sanjay Shinde are not supporters of anyone: Narayan Patil's allegation
Babandada Shinde, Sanjay Shinde are not supporters of anyone: Narayan Patil's allegation

सोलापूर : नाय...नाय...नाय... ते (आमदार बबनराव शिंदे Babandada Shinde आणि आमदार संजय शिंदे Sanjay Shinde) कोणाचेही समर्थक नाहीत. हे पहिल्यांदा तुम्ही जरा समजून घ्या. भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) सरकार असताना त्यांनी भाजपची हुजरेगिरी केली. त्यावेळी भाजपकडून जो लाभ घेता येईल, तो त्यांनी करून घेतला आहे. आता आम्ही पवारांचे (Pawar) आहोत, पवारांचे खंदे समर्थक आहोत, हे सांगून ते पवारांचीही दिशाभूल करीत आहेत, असा टोला करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायणआबा पाटील (Narayan Aaba Patil) यांनी आमदार बबनराव शिंदे आणि संजय शिंदे या बंधूंना लगावला. (Babandada Shinde, Sanjay Shinde are not supporters of anyone: Narayan Patil's allegation)

उजनी धरणातून इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या निर्णयाविरोधात सोलापूर जिल्ह्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्याबाबतची दिशा ठरविण्यासाठी सर्वपक्षीय बैठक येत्या रविवारी (ता. १६ मे) आयोजित करण्यात आली आहे. त्याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार पाटील बोलत होते.

त्या वेळी त्यांना पत्रकारांनी करमाळा आणि माढा तालुक्याचे दोन्ही आमदार अजितदादा समर्थक आहेत. त्यांची भूमिका तुमच्यासोबत असेल का, असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी वरील टोला शिंदे आमदार द्वयींना लगावला. 

ते म्हणाले की, उजनीच्या पाण्याचे वाटप पूर्ण झालेले असताना सांडपाण्याच्या नावाखाली धरणातून इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या निर्णयाला विरोध करण्यासाठी भविष्यातील लढ्याची दिशा निश्चित करण्यासाठी आम्ही उद्या (ता. १६ मे ) बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत उजनी धरणाच्या पाणी प्रश्नाबाबतची ध्येय धोरणे कशी राहतील, याची पुढची दिशा ठरविण्यात येणार आहे.

हा निर्णय म्हणजे उजनी धरणग्रस्तांवर मोठा अन्याय आहे. ज्यांनी मोठा त्याग करून धरणासाठी जमिनी दिल्या, घरदारी पाण्याखाली गेली. उजनी धरणासाठी विस्थापीत झालेल्या जनतेचे अजून पुनर्वसन व्हायचे बाकी आहे. त्या अगोदच उजनीकाठच्या लोकांवर हे मोठं संकट या निमित्ताने आलेले आहे. हे संकट जाणूनबुजून आणण्यात आलेले आहे. उजनी धरणात पाणी शिल्लक असतं आणि ते जर उचलंल असतं तर आमचा त्या गोष्टीला विरोध नसता. मात्र, पाणी शिल्लक नसताना धरणाच्या मृतसाठ्यात कोणी पाणी घेत असेल तर त्यावर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

उजनीच्या पाण्याबाबत वेळप्रसंगी आपल्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका राहील का या प्रश्नावर पाटील म्हणाले, ‘‘आम्ही आमच्या हक्कासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करू. त्यांची दिशाभूल करून याबाबतच्या निर्णयावर सही घेण्यात आली आहे. ते कुठेतरी त्यांच्या लक्षात येईल आणि तेसुद्धा हा निर्णय बदलायच्या मनस्थितीत असतील.’’ 

सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, असे आंदोलन जनतेला सोबत घेऊन केले जाईल. उजनी धरणाच्या पाण्याप्रश्नी आम्ही न्यायालयातही जाणार आहोत, असा इशाराही माजी आमदार नारायण पाटील यांनी या वेळी बोलताना दिला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com