मुंबई : खरे पाहता बिहारमध्ये पुढच्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी तसेच तेथील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणी निवडणूक लढवायचे ठरवले. पण नितीश कुमार यांनी मुद्दाम आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळू दिले नाही. ते मिळाले असते तर आम्हाला जास्त मते मिळाली असती, असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
बिहारमध्ये शिवसेनेला खातेही उघडता न आल्यामुळे सेनेचे कोणीही आता प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. खैरे यांनी मात्र खुलेपणाने आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, "पूर्वी जनसंघाचे निष्ठावान कार्यकर्ते आपले दिवा हे चिन्ह घराघरात जावे यासाठी चिकाटीने प्रयत्न करीत असत. जरी निवडणुक हरले, डिपॉझिट गमावले तरीही ते हार मानीत नसत, त्याचे परिणाम आज आपल्याला दिसत आहेत. त्याचप्रमाणे पुढच्या निवडणुकांसाठी तेथे व्यूहरचना करून कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आम्ही ही निवडणुक लढवली,''
हे देखिल वाचा - काँग्रेसने स्वतःचे चारित्र्य पहावे - प्रकाश आंबेडकर
''खरे सांगायचे तर आम्ही सगळेच नेते महाराष्ट्रातील आपापल्या शहरांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या सेवेत अडकलो होतो. त्यामुळे फारशी आखणीही करता आली नाही, मात्र एकदा तेथे गेल्यावर सर्वोच्च प्रयत्न केले. मी, प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाई, पंजाबचे राज्यप्रमुख असा आम्ही प्रचार केला. माझ्याबरोबर संभाजीनगरचे पदाधिकारीही होते. उत्तर प्रदेशात आमचे संघटन मजबूत आहे, तसे बिहारमध्ये नाही. मात्र अशीच चिकाटीने पक्षाची ताकद वाढेल हे निश्चित,'' असेही ते म्हणाले.
''निवडणुक आयोगाच्या लेखी आमचे अस्तित्व टिकावे हा हेतू तर होताच. मात्र मला दिल्ली विधानसभा निवडणुकीची आठवण यानिमित्ताने येते. तेथील चार मतदारसंघात आम्ही भाजपच्या उमेदवारांना हरवले. तेथे आम्हाला अगदी २५० ते १७०० मते मिळाली व त्या त्या ठिकाणी नेमक्या साधारण तितक्याच मतांनी भाजपचे उमेदवार पडले. अर्थात आम्ही काही भाजपला पाडण्यासाठीच म्हणून उभे रहात नाही, पण त्यांचे काही नेते आम्हाला नगण्य समजण्याची चूक करतात हे देखील तितकेच खरे,'' असेही खैरे म्हणाले.
हळूहळू ताकद वाढवणार
नितीशकुमार यांचे चिन्ह बाण होते व त्याचमुळे मतदारांचा गोंधळ होऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळू दिले नाही. आम्हाला तुतारीवाला माणूस हे चिन्ह मिळाले. धनुष्यबाण चिन्ह असते तर निश्चितच फरक पडला असता. आमचे डिपॉझिट गेले हे खरे आहे, मात्र आम्ही हळूहळू ताकद वाढवणार, अशी खात्रीही चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली.
Edited By - Amit Golwalkar

