....म्हणून भाजपने काँग्रेसचे राहुल पाटलांना पाठिंबा दिला - ....So BJP supported Rahul Patel of Congress : Samarjit Singh Ghatge | Politics Marathi News - Sarkarnama

....म्हणून भाजपने काँग्रेसचे राहुल पाटलांना पाठिंबा दिला

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 12 जुलै 2021

राहुल पाटील हे सर्वांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेतील कामकाज करतील, याचा विश्‍वास आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडी आणि जनसुराज्य पक्ष यांनी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. मात्र, महाविकास आघाडीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जनसुराज्यचे नेते आमदार विनय कोरे यांना केलेल्या विनंतीला मान देऊन तसेच आमदार पी. एन. पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना केलेल्या विनंतीला मान देऊन जिल्हा परिषदेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला, असे कोल्हापूरचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. (....So BJP supported Rahul Patel of Congress : Samarjit Singh Ghatge)

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंतराव शिंपी यांची आज बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यावर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे. पाठिंब्याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी वरील स्पष्टीकरण दिले.

हेही वाचा : काँग्रेस आमदाराचे पुत्र झेडपी अध्यक्ष होताच भाजपच्या गोटात पसरला आनंद!

काँग्रेसचे राहुल पाटील यांची अध्यक्षपदी निवड होत असल्याचे पाहून त्यांना पाठिंबा म्हणून भाजप आणि मित्रपक्षांनी निवडणूक लढविली नाही. राहुल पाटील हे सर्वांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेतील कामकाज करतील, याचा विश्‍वास आहे. तसेच, महाविकास आघाडीतील नेत्यांकडून यापुढेही सकारात्मक आणि सन्मानाचे राजकारण होईल, या भावनेतून भाजप आणि मित्रपक्षांनी जिल्हा परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करण्याचे ठरविले. त्यानुसार अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी निवडणुकीत सहभाग घेतला नाही, असे घाटगे पत्रकात म्हटले आहे.

राहुल पाटील यांनी मानले सर्वांचे आभार

जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राहुल पाटील -सडोलीकर यांचा सडोली खालसा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.त्यावेळी बोलताना पाटील यांनी करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी.एन.पाटील,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार,सर्व खासदार,महाविकास आघाडीचे सर्व नेते तसेच हि निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल भाजप ताराराणी आघाडी (महाडिक गट),ताराराणी आघाडी (आवाडे गट), काँग्रेस कार्यकर्ते व ग्रामस्थांचे आभार मानले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख