काहींची चुळबूळ पाहून भाजपने आपल्या सदस्यांना पाठवले सहलीवर  - BJP members from Kolhapur Zilla Parishad went on a trip | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

काहींची चुळबूळ पाहून भाजपने आपल्या सदस्यांना पाठवले सहलीवर 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 8 जुलै 2021

हे सर्व सदस्य एकत्रित येणार कधी, हाच खरा प्रश्‍‍न आहे.

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्‍हा परिषद पदाधिकारी निवडीच्या पार्श्‍वभूमीवर काही सदस्यांची चुळबूळ लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने आपल्या सदस्यांना आज (ता. ८ जुलै) सहलीवर पाठविले आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्यने मात्र अद्याप आपली भूमिका स्‍पष्‍ट केलेली नाही. येत्या दोन दिवसांत त्यांची बैठक होणार आहे. (BJP members from Kolhapur Zilla Parishad went on a trip)

माजी आमदार सुरेश हाळवणकर व भाजपचे जिल्‍हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी बुधवारीच (ता. ७ जुलै) भाजप सदस्यांची बैठक घेत त्यांना सहलीवर पाठवणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सदस्य सहलीसाठी कोकणात रवाना झाले. अजूनही काही सदस्य सहलीवर गेलेले नाहीत. ते येत्या दोन दिवसांत सहलीवर जाण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा : नऊ तासांच्या चौकशीत ईडीने खडसेंना हे सांगितले

कोल्हापूर जिल्‍हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता आहे. ठरल्याप्रमाणे पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पदाधिकारी बदलाचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारी (ता. १२ जुलै) अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी तर मंगळवारी (ता. १३ जुलै) सभापती पदासाठी निवडणूक होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजप सदस्यांना सहलीवर पाठविण्यात आले आहे. ही निवडणूक लढवावी किंवा नाही, याबाबत भाजप सदस्यांमध्ये उलटसुलट मतप्रवाह आहेत. ही जर निवडणूक भाजपने लढवली नाहीतर अन्य कोणाला पाठिंबा देता येईल का, अशी चर्चाही झाली आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षानेही सावध पवित्रा घेतला आहे.

भाजपकडे सध्या १४ सदस्य आहेत. जनसुराज्यचे ६, ताराराणी आघाडीचे २ तर आवाडे गटाचे २ सदस्य आहेत. त्यामुळे भाजप आघाडीचे संख्याबळ २४ आहे. यातील फक्‍त भाजपचेच सदस्य सहलीवर गेले आहेत. भाजपातील काही सदस्यांची चुळबूळ सुरू असल्याने हा निर्णय घेतला असल्याचीही चर्चा आहे. मात्र, अजूनही भाजपचे मित्र असलेल्या जनसुराज्य, ताराराणी आघाडी तसेच आवाडे गटाच्या सदस्यांची बैठक झालेले नाही. ताराराणी गटाच्या सदस्यांचीही काही अडचण नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हे सर्व सदस्य एकत्रित येणार कधी, हाच खरा प्रश्‍‍न आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख