विधान परिषद डोळ्यासमोर ठेवून जयंतरावांची सोलापुरात ही खेळी - Supporters of Shiv Sena and MIM corporators in Solapur will join NCP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

विधान परिषद डोळ्यासमोर ठेवून जयंतरावांची सोलापुरात ही खेळी

प्रमोद बोडके
गुरुवार, 15 जुलै 2021

अन्य सहा नगरसेवक गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपर्कात आहेत.

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील हे उद्या (शनिवारी, ता. 17 जुलै) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या उपस्थितीत सोलापुरातील हेरिटेज गार्डनमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. या प्रसंगी एमआयएम व शिवसेनेतील नगरसेवकांच्या समर्थकांचा आणि नातेवाईकांचाच राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा अद्याप मुहूर्त निघाला नसल्याचे समजते. (Supporters of Shiv Sena and MIM corporators in Solapur will join NCP)

सोलापूर महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व शिवसेना नगरसेवक महेश कोठे, एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख आणि अन्य सहा नगरसेवक गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सोलापूरच्या दौऱ्यावर येत असल्याने या दौऱ्यातील कार्यक्रमात नगरसेवक कोठे, शेख यांच्यासह एमआयएमच्या नगरसेवकांचा प्रवेश होईल, अशी शक्‍यता व्यक्त केली जात होती. मात्र, त्यांच्या प्रवेशाबाबत अद्याप पक्षीय पातळीवर तेवढ्याशा हालचाली होताना दिसत नाहीत. 

हेही वाचा : गणेश नाईकांचा शिवसेना, राष्ट्रवादीला दे धक्का!

विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तूर्तास कोणत्याही नगरसेवकाला प्रवेश न देण्याचे धोरण राष्ट्रवादी कॉंग्रेसने आखले असल्याचे समजते. नगरसेवकांना सध्या थेट राष्ट्रवादीत प्रवेश देण्याऐवजी नगरसेवकांच्या घरातील सदस्य, समर्थक, माजी नगरसेवक यांना जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश दिला जाणार असल्याचे समजते. 

कारण, ह्या सहा नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यास त्यांचे सदस्यत्व पक्षांतर बंदी कायद्यामुळे रद्द होऊ शकते. ते होऊ नये आणि नगरसेवकांच्या मतांची बेगमी कायम राहावी, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने विशेषतः जयंत पाटील यांनी ही खेळी केल्याचे सांगण्यात येते.   

शनिवारी (ता. 17 जुलै) होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, आमदार यशवंत माने यांच्यासह सोलापूर शहर व जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सोलापूर महापालिका व जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आतापासूनच वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख