भाजपला मी चॅलेंज करते, त्यांनी उजनीवरून दुसरी जलवाहिनी करून दाखवावी

शिंदे यांनी काय केले, केवळ उजनीचे पाणी आणले.
भाजपला मी चॅलेंज करते, त्यांनी उजनीवरून दुसरी जलवाहिनी करून दाखवावी
Praniti Shinde's challenge to BJP over another pipeline from Ujani dam

सोलापूर : कॉंग्रेसने आजवर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष दिले नाही. परंतु, आगामी निवडणुकांमध्ये या मतदारसंघातील कॉंग्रेसची ताकद निश्‍चितपणे दाखवू, असा इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी आज भाजपसह अन्य पक्षांतील नेत्यांना दिला. (Praniti Shinde's challenge to BJP over another pipeline from Ujani dam)

'कॉंग्रेस मनामनात, कॉंग्रेस घराघरात' या मोहिमेचा आज शुभारंभ उत्तर कसबा परिसरात झाला. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर टीका केली. या प्रसंगी शहराध्यक्ष प्रकाश वाले, प्रवीण वाले, माजी महापौर संजय हेमगड्डी, नगरसेवक चेतन नरोटे, हेमा चिंचोळकर, मनोज यलगुलवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमावेळी वाले, नरोटे यांच्यासह अन्य नेत्यांनी भाजपविरूध्द टीकेची झोड उठविली. 

प्रणिती शिंदे म्हणाल्या, भाजपकडून सातत्याने केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका केली जाते. परंतु, शिंदे यांनी काय केले, केवळ उजनीचे पाणी आणले. उजनी, उजनी काय करताय, आहे का तुमच्यात हिम्मत दुसरी पाईपलाईन आणण्याची. किती वर्षे आम्ही दुहेरी पाईपलाईनचे नाव ऐकतो. त्यांचे दोन मंत्री, एक खासदार असतानाही त्यांना ते जमले नाही. भाजपला मी चॅलेंज करते, केंद्रात त्यांची सत्ता असून मोदीबाबा पंतप्रधान आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांनी हे काम पूर्ण करून दाखवावे, असे आव्हानही प्रणिती शिंदे यांनी भाजप नेत्यांना दिले. 

केंद्र सरकारने हॉस्पिटल, व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन पुरेशा प्रमाणात दिले असते, तर एवढी लोकं मेली नसती. त्यांच्या मृत्यूला केवळ पंतप्रधान मोदी हेच जबाबदार आहेत, असा हल्लाही शिंदे यांनी चढविला.

एक चांगला रस्ता दाखवा; मी राजीनामा देतो

भाजप सत्ताधाऱ्यांनी सोलापूर शहरवासियांच्या घराघरांत पाणी आणण्याऐवजी महागाई आणली. जातीच्या नावाखाली त्यांनी आजवर राजकारण केले. स्मार्ट सिटीच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू आहे. वायफायने लोकांची पोटं भरणार नाहीत. शहराच्या एकूण परिसरातील तीन टक्‍के भागात स्मार्ट सिटी होत आहे. हातावरील पोट असलेल्या लोकांसाठी काहीच केले जात नाही. केवळ टक्‍केवारीतून स्वत:ची आणि कंत्राटदारांची पोटं मोठी केली, अशीही टिका आमदार प्रणिती शिंदे यांनी या कार्यक्रमात केली. तर, दुसरीकडे शहर उत्तरमधील एक रस्ता चांगला दाखवा, मी नगरसेवकपदाचा राजीनामा देतो, असे चॅलेंज चेतन नरोटे यांनी भाजप नेत्यांना दिले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in