पाच पिढ्या नाव काढतील, असे काम करतोय; पण मताधिक्यही साडेतीन नव्हे, तर ३५ हजारांचे हवे
Minister of State Dattatreya Bharane felicitated at Indapur as a Corona Warrior

पाच पिढ्या नाव काढतील, असे काम करतोय; पण मताधिक्यही साडेतीन नव्हे, तर ३५ हजारांचे हवे

सध्या सर्वत्र राष्ट्रवादी जोडो अभियान सुरू असून जुने व नवीन यांनी संघटित काम करायचे आहे.

इंदापूर (जि. पुणे) :  इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे ८०० कोटी रुपयांचे टेंडर १५ दिवसांत निघणार आहे, तर जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून ४१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता फक्त तालुक्यातील पाणीप्रश्नावर लक्ष केंद्रित केले असून पुढील ५ पिढ्या नाव काढतील, असे काम करत आहे. मात्र, पुढील विधानसभेस ३५०० वरून किमान ३५ हजार ते ५० हजार मताधिक्य मिळवून देण्याचे नियोजन तुम्ही सर्वांनी करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केली. (Minister of State Dattatreya Bharane felicitated at Indapur as a Corona Warrior)

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने, तहसीलदार अनिल ठोंबरे, गटविकासअधिकारी विजयकुमार परीट, पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, दिलीप पवार, जीवन माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील गावडे, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. सुहास शेळके, डॉ. नामदेव गार्डे, डॉ. ऋषिकेश गार्डे, रेहाना मुलाणी, उमा इंगुले, अश्विनी राऊत, पत्रकार, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, पोलिस कर्मचारी यांचा कोरोनायोद्धा म्हणून इंदापुरात सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उस्फूर्त गर्दी झाल्याने कोरोना नियमांचे पालन करायला लावण्यात संयोजक कमी पडले.

मंत्री भरणे म्हणाले, मुंबईत मंत्रिमंडळ, सोलापूरचा पालकमंत्री आणि इंदापूरचा लोकप्रतिनिधी म्हणून कोरोना काळात मी कुठेच कमी पडलो नाही. त्यामुळे कोरोनायोद्धा म्हणून आपण बहुमान केला असला तरी हा आपणा सर्वांचा सन्मान आहे. कोरोना काळात राज्यात सर्वाधिक रक्तदान, जीवनावश्यक कीटचे वाटप इंदापूर तालुक्यात झाले. पूरग्रस्तांसाठी सर्वात प्रथम मदत इंदापूर तालुक्याने पोचवली.

सध्या सर्वत्र राष्ट्रवादी जोडो अभियान सुरू असून जुने व नवीन यांनी संघटित काम करायचे आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सर्व जागी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकवावा, असे आवाहनही भरणे यांनी केले.
 
जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले, कोरोनाचे पुणे शहरातील प्रमाण कमी होत आहे. मात्र, ग्रामीण भागात वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी सदा सावध, सदा सुखी या तत्वाने आपले, कुटुंब, समाज व गावाचे कोरोनापासून रक्षण करणे गरजेचे आहे. कारण, आपणा सर्वांना आणखी एक वर्ष कोरोनाशी लढायचे आहे.

माजी सभापती प्रवीण माने म्हणाले, आपला जीव मुठीत ठेवून ज्यांनी कोरोना काळात सेवा दिली, त्यांच्या कार्यास प्रोत्साहन म्हणून हा सन्मान सोहळा झाला. मात्र पुन्हा कोरोनाचे दिवस येऊ नयेत; म्हणून सर्वांनी लसीकरण करून घेणे गरजेचेआहे. इंदापूर तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार मंत्री दत्तात्रेय भरणेच आहेत.

कार्यक्रमाचे मुख्य संयोजक तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, सरपंच कुंडलिक कचरे यांची भाषणे झाली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in