बागल-जगताप संघर्ष टोकाला; सचिवाबाबतच्या बैठकीला काही संचालक दांडी मारणार?

सत्ताधारी बागल गट व माजी आमदार जयंवतराव जगताप यांच्यात 29 जूनच्या बैठकीत चढाओढ लागण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
Dispute in Bagal-Jagtap group over appointment of secretary of Karmala market committee
Dispute in Bagal-Jagtap group over appointment of secretary of Karmala market committee

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव निवडीचा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सचिवपदचा पदभार स्वीकारलेले विठ्ठल क्षीरसागर यांच्या पणन संचालकाकडील अपिलावर आज (ता. 28 जूनला) सुनावणी न होता ती आता ८ जुलै रोजी होणार आहे. विठ्ठल क्षीरसागर यांना आम्ही नियुक्ती दिली नाही; म्हणून सत्ताधारी यांनी केलेल्या मागणीनुसार जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या उपस्थितीत ता. 29 जूनला संचालक मंडळाची बैठक होणार आहे. (Dispute in Bagal-Jagtap group over appointment of secretary of Karmala market committee)

दरम्यान, बाजार समितीच्या 29 जून रोजी होणाऱ्या बैठकीला काही संचालक गैरहजर राहण्याची शक्यता आहे. मागील बैठकीला सत्ताधारी गटाचे संचालक तथा बारामती अ‍ॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, संतोष वारे हे गैरहजर होते. या बैठकीत सचिवांना मुदतवाढ देण्याच्या विषयाला समान मतदान झाले, तेव्हा सभापतींनी विशेष मताचा अधिकार वापरला. याही बैठकीला आपण वादात पडायला नको; म्हणून काही संचालक गैरहजर राहणार असल्याची खात्रीलायक चर्चा आहे, त्यामुळेच उद्याच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सत्ताधारी बागल गटाचा विठ्ठल क्षीरसागर यांना पदभार देण्यास विरोध आहे, तर दुसरीकडे सेवाजेष्ठतेनुसारच पात्र कर्मचाऱ्यालाच सचिवपदाची संधी दिली पाहिजे, अशी मागणी विरोधी जगताप गट व कर्मचारीही करत आहेत. त्यामुळे सत्ताधारी बागल गट व माजी आमदार जयंवतराव जगताप यांच्यात 29 जूनच्या बैठकीत चढाओढ लागण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

सेवाज्येष्ठ कर्मचारी विठ्ठल क्षीरसागर यांच्याकडे सेवानिवृत्त सचिव सुनील शिंदे यांनी सचिव पदभार सोपविला आहे, तर सभापती शिवाजी बंडगर व सत्ताधारी संचालक मंडळ हे राजेंद्र पाटणे यांची प्रभारी सचिव म्हणून निवड व्हावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सचिवपदाचा विषय चांगलाच चिघळला आहे.

सभापती शिवाजी बंडगर यांनी सेवानिवृत्त सचिवांनी आमचा आदेश डावलून पदभार दिल्याचे पणन संचालकांना कळविले आहे. यावर पणन संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांना संचालकांची सभा बोलावून महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन कर्मचारी सेवा नियमातील तरतुदी व बाजार समितीची कागदपत्रे तपासून सचिव पदभार हस्तांतरणाबाबत योग्य कार्यवाही करण्याबाबत कळविले आहे. त्यामुळे आता जिल्हा उपनिबंधकांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची ता. 29 जून रोजी बैठक होणार आहे. या सभेत काय निर्णय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सचिवपदाचा पदभार देताना कायदेशीर बाबींचे उल्लंघन करू नये, अशी विरोधकांची मागणी आहे. सत्ताधारी सभापती व संचालक सेवाजेष्ठता डावलून राजेंद्र पाटणे यांना नियुक्ती देण्याच्या विचारात आहेत, असे विरोधकांचे म्हणणे आहे. तर सत्ताधारी मंडळी बहुमताने निर्णय घेऊन पाटणे यांनाच सचिव करायचे, यावर ठाम आहेत.

कर्मचारी संघटना क्षीरसागरांच्या पाठीशी

बाजार समितीचे एकूण 10 पैकी 9 कर्मचारी हे सेवाज्येष्ठतेनुसारच क्षीरसागर यांचीच नेमणूक व्हावी; अन्यथा आम्ही हा अन्याय सहन करणार नाही, असे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेश ढाणे यांनी सांगितले. तसेच, महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिलीप डेबरे यांनीदेखील सेवा ज्येष्ठतेनुसारच क्षीरसागर यांना नेमणूक देण्याबाबत बाजार समितीस लेखी कळविले आहे. त्यामुळे 28 जून रोजी पणन संचालकांपुढे होणारी अपिलाची सुनावणी व 29 जून रोजी होणाऱ्या बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com