अकलूज नगरपरिषदेवरून धवलसिंह-रणजितसिंह आमने सामने

राजकीय नेत्यांमध्ये टोकाची मतभिन्नता दिसून येत आहे.
Disagreement between Mohite Patil over establishment of Akluj Municipal Council revealed
Disagreement between Mohite Patil over establishment of Akluj Municipal Council revealed

अकलूज : संभाव्य अकलूज नगरपरिषदेत कोणकोणत्या गावांचा समावेश असावा, याबाबत राजकीय नेत्यांमध्ये टोकाची मतभिन्नता दिसून येत आहे. आजवर एकमुखी निर्णय होणाऱ्या अकलूजमध्ये आता भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये शह-कटशहाचे राजकारण सुरु झाल्याचे वास्तव या निमित्ताने समोर येऊ लागले आहे. (Disagreement between Mohite Patil over establishment of Akluj Municipal Council revealed)

अकलूज आणि माळेवाडी या दोन ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेत व्हावे, अशी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची मागणी आहे. या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मंगळवारपासून (ता. २२ जून) साखळी उपोषण सुरु आहे. या आंदोलनाला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी उपस्थिती लावलेल्या या आंदोलनात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघाचे संघटन सरचिटणीस धैर्यशिल मोहिते-पाटील, उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांसह नागरिकांचा मोठा सहभाग आहे. 

अकलूज, माळेवाडीचे रुपांतर नगरपरिषदेत झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही, हा निर्धार या जनआंदोलनातून व्यक्त होत आहे. केवळ राजकीय आकसातून अकलूजची नगरपरिषदेची मागणी प्रलंबीत ठेवली जात आहे, असा आरोप केला जात आहे. त्यासाठी वैराग (ता. बार्शी, जि. सोलापूर) आणि माळेगाव (जि. पुणे) नगरपंचायत निर्मितीचे उदाहरण दिले जात आहे. या मागणीला कॉंग्रेस आणि शिवसेनेचा विरोध नसून केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध आहे. 

विधान परिषदेच्या मतदारयाद्या तयार होण्यापूर्वी जर अकलूज नगरपरिषद व नातेपुते नगरपंचायत अस्तित्वात आली तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा फटका बसेल, अशी भिती राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटत आहे. स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचे ऐकून उपमुख्यमंत्री अजित पवार अकलूज नगरपरिषदेच्या निर्मितीत खोडा घालत आहेत, असा थेट आरोप मोहिते पाटील गटाकडून केला जात आहे.

भाजपच्या नेत्यांची ही मागणी म्हणजे केवळ राजकीय फार्स असल्याची टीका कॉंग्रेसचे नेते डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. ते म्हणाले, अकलूज ग्रामपंचायतीची लोकसंख्या 1985 मध्ये सुमारे 27 हजार होती. त्यात शंकरनगर, आनंदनगर, माळीनगर, संग्रामनगर, चौंडेश्वरवाडी, बागेवाडी, माळेवाडी या आठ गावांचा समावेश होता. त्यावेळी विभागणी केली नसती तर तेव्हाच नगरपरीषद झाली असती. जुन्या अकलूजची लोकसंख्या 2021 च्या नोंदीनुसार सुमारे एक लाख पाच हजाराच्या आसपास आहे. त्यामुळे जुन्या अकलूजलाही विकासात सामावून घेतले पाहिजे. जुन्या अकलूजला वगळून केवळ अकलूज व माळेवाडीची नगरपरीषद करण्यामागे राजकीय डाव आहे. 

तालुक्‍यात नगरपरिषद व नगरपंचायत वाढवून विधान परिषदेचे मतदार वाढवायचे आणि जुन्या अकलूजमधील गावे बाहेर ठेऊन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागा कमी होऊ द्यायच्या नाहीत. सगळीकडे आपण सत्तेत राहिले पाहिजे, यासाठी हा अट्टाहास आहे. त्यामुळे जुन्या अकलूज परिसरासह नगरपरिषद झाली पाहिजे, यासाठी आम्ही प्रत्येक पातळीवर प्रयत्न करणार आहोत. प्रसंगी सर्व प्रकारच्या आंदोलनाचीही तयारी आहे, असा इशारा धवलसिंह मोहिते पाटील यांनी दिला.
 
यशवंनगर आणि संग्रामनगर ग्रामपंचायतीचा समावेश संभाव्य नगरपरिषदेत करावा. या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी मंत्रालयाचे दार ठोठावले आहे. यशवंनगर व संग्रामनगर या ग्रामपंचायती अकलूजच्या विभाजनातून उदयास आलेल्या आहेत. अकलूज, यशवंनगर, संग्रामनगरसाठी एकच संयुक्त पाणीपुरवठा योजना आहे. त्यामुळे या गावांचा समावेश नगरपरिषदेत झाला पाहिजे, अशी मागणी साठे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. 

महाळूंग-श्रीपूर नगरपंचायत अस्तित्वात आल्यामुळे महाळूंग जिल्हा परिषद गट संपुष्टात आला आला आहे. त्यानंतर आता शंकरनगर व यशवंतनगरचा समावेश नगरपरिषदेत झाला तर, अकलूज, शंकरनगर व यशवंतनगर या तीन जिल्हा परिषद गटांचे अस्तित्व धोक्‍यात येऊ शकते. त्यामुळे संभाव्य अकलूज नगरपरिषदेत कोणकोणत्या गावांचा समावेश होईल, याची चिंता राजकीय मंडळींना सतावताना दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com