राष्ट्रवादीत जिल्हाध्यक्ष बदलाच्या हालचाली; साळुंखे, पाटील, जानकर यांची नावे चर्चेत   

राष्ट्रवादीच्या बैठकीतील काही किस्से आता समोर येऊ लागले आहेत.
The party is trying to change the district president of Solapur NCP
The party is trying to change the district president of Solapur NCP

सोलापूर  ः राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने केलेला शिरकाव, उजनीचे पाणी इंदापूरला देण्यावरुन उठलेले राजकीय वादळ अशा विचित्र परिस्थितीत सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस सध्या अडकली आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसह जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. नव्या समीकरणांमध्ये होत असलेल्या या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीत नव्या अध्यक्षांची चाचपणी केली जात आहे. माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या गळ्यात पुन्हा अध्यक्षपदाची माळ पडणार की सध्या कार्याध्यक्ष पदावर कार्यरत असलेल्या उमेश पाटील यांचे प्रमोशन होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (The party is trying to change the district president of Solapur NCP) 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पुण्याच्या बैठकीत जे घडले, त्यावर ग्रामीण भागातील कोणताही नेता उघडपणे बोलायला तयार नाही. पुण्याच्या त्या बैठकीत सोलापूर शहर राष्ट्रवादीमधील बित्तमबातमी बाहेर आली. ग्रामीण राष्ट्रवादीच्या बैठकीतील काही किस्से आता समोर येऊ लागले आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांना थांबण्याचा दिलेला सल्ला हा एक त्यातील महत्वाचा किस्सा मानला जात आहे. त्यातच पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी राष्ट्रवादीतील बदलाचे संकेत दिल्याने अध्यक्ष बदलाच्या चर्चांना वेग आला आहे. 

माजी आमदार दीपक साळुंखे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाचा अनुभव आहे, जिल्ह्याच्या राजकारणाची त्यांना माहिती आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षाच्या स्पर्धेतील हे एक प्रमुख नाव म्हणून पाहिले जाते. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीपूर्वी साळुंखे यांनी स्वत:हून सोडलेले पद व पक्षाचा धुडकावलेला आदेश, मित्रपक्ष शेकापचे उमेवार डॉ. अनिकेत देशमुख यांच्या विरोधात सांगोल्यात केलेला प्रचार आणि त्यातून नाराज झालेला मित्रपक्ष शेकाप व धनगर समाज या गोष्टी साळुंखे यांच्यासाठी येत्या काळात डोकेदुखी ठरण्याची शक्‍यता आहे. 

कुठल्याही गटातटाच्या राजकारणात न अडकलेले कार्याध्यक्ष उमेश पाटील यांचेही नाव या पदासाठी महत्वाचे मानले जाते. सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला संधी यातून मिळणार आहे. उत्तम संघटन कौशल्य आणि संभाषण कौशल्य या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्याशी उमेश पाटील यांनी घेतलेला पंगा हा एकमेव मोठा अडसर उमेश पाटील यांच्या जिल्हाध्यक्षपदासाठी येऊ शकतो. 

ग्रामीण राष्ट्रवादीने गेल्या काही महिन्यांमध्ये फक्त पराभवच पाहिले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत माजी आमदार साळुंखे यांचा झालेला पराभव. माढा लोकसभेत राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचा झालेला पराभव, जिल्हा परिषदेच्या 2020 च्या अध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीचे उमेदवार त्रिभुवन धाईंजे यांचा झालेला पराभव आणि नुकत्याच झालेल्या पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांचा झालेला पराभव यामुळे राष्ट्रवादी म्हणजे पराभव हे समीकरणचं तयार झाले आहे. या पराभवांचे उट्टे काढण्यासाठी सर्वसमावेशक आणि साम, दाम, दंड भेद या नितीची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या अध्यक्षाची ग्रामीण राष्ट्रवादीला नितांत गरज निर्माण झाली आहे. 


या नावांचाही होऊ शकतो विचार 

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अनेक अध्यक्ष आले आणि गेले आहेत. जिल्हाध्यक्ष कसे असावेत? याचे उदाहरण देताना आजही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांचा संदर्भ देतात. डोंगरे यांच्या प्रामाणिकपणाची आणि पक्षासाठी असलेली तळमळीची आजही चर्चा होते हे विशेष. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि माळशिरसचे राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com