सूनबाई बनल्या सरपंच, तर उपसरपंचपदाचा मान सासऱ्यांना! - Daughter in law elected as Sarpanch of Chas village, while Father-in-law gets opportunity as Deputy Sarpanch | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

सूनबाई बनल्या सरपंच, तर उपसरपंचपदाचा मान सासऱ्यांना!

विवेक शिंदे
गुरुवार, 17 जून 2021

असा योगायोग जुळून आला आहे.

महाळुंगे पडवळ (जि. पुणे) : आंबेगाव तालुक्यातील चास ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवाजी महादू बारवे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्यांच्या सूनबाई सुजाता विक्रम बारवे ह्या जनतेतून सरपंच म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे गावच्या सरपंचपदी सूनबाई,  तर चुलत सासरे उपसरपंच असा योगायोग चास गावात जुळून आला आहे. (Daughter in law elected as Sarpanch of Chas village, while Father-in-law gets opportunity as Deputy Sarpanch)

चास ग्रामपंचायतीची डिसेंबर २०१७ मध्ये पंचवार्षिक निवडणूक पार पडली. त्यावेळी जनतेतून सरपंच पदाची निवड करण्यात आलेली होती. त्यावेळी सुजाता बारवे ह्या चांगले मताधिक्य घेत सरपंच म्हणून निवडून आले आहेत. सरपंच सुजाता बारवे यांचे सख्खे चुलत सासरे शिवाजी बारवे हे ते राहत असलेल्या गणेशवाडी वॉर्डातून निवडून आलेले आहेत. 

हेही वाचा : प्रदीप शर्मा अटकेप्रकरणी चंद्रकांतदादांनी शिवसेनेवर टीका का टाळली?

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष सचिन भोर व पुणे जिल्हा परिषद सदस्या तुलसी भोर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकारी निवड झाली आहे. पहिल्या अडीच वर्षांसाठी प्रथम उपसरपंचपदाचा मान श्रीकांत चासकर यांना देण्यात आला होता. त्यानंतर किरण बारवे यांना उपसरपंचपद देण्यात आले. दोघांनीही त्यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीच्या विकास कामांसाठी हातभार लावला आहे.  

किरण बारवे यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक जाहीर झाली होती. सरपंच सुजाता विक्रम बारवे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच निवडणूक प्रक्रिया झाली. सरपंच सुजाता बारवे यांचे चुलत सासरे शिवाजी बारवे यांचा एकमेव अर्ज उपसरपंचपदासाठी आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. 

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी जयवंत मेंगडे यांनी कामकाज पाहिले. या प्रसंगी उद्योजक सुनील अप्पा बारवे, बाजीराव बारवे, माजी उपसरपंच श्रीकांत चासकर, संतोष रोकडे, विनायक घोडे, शीतल कढणे, अलका मानकर उपस्थित होते.

उपसरपंचपदी निवड झालेले शिवाजी बारवे हे सरपंच सुजाता बारवे यांचे चुलत सासरे आहेत. सून सरपंच, तर सासरे उपसरपंच असा योगायोग ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदा जुळून आल्याची चर्चा आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख