शिवसेना नगरसेवकाची भाजपच्या बैठकीला उपस्थिती - Attendance of Shiv Sena corporator at BJP's pre-budget review meeting-vd83 | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेना नगरसेवकाची भाजपच्या बैठकीला उपस्थिती

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 22 जुलै 2021

त्यामुळे मी भाजपच्या बैठकीला उपस्थिती लावली.

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या 2021-22 ची अंदाजपत्रकीय सभा येत्या मंगळवारी (ता. 27 जुलै) होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आजपासून (ता. 22 जुलै) सत्ताधारी व विरोधकांच्या स्वतंत्र बजेटपूर्व आढावा बैठकांना सुरुवात झाली. या बैठकांमध्ये शिवसेनेचे नगरसेवक राजकुमार हंचाटे ह्यांनी भारतीय जनता पक्षाच्या बैठकीला हजेरी लावली, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. (Attendance of Shiv Sena corporator at BJP's pre-budget review meeting)

शिवसेनेचे नगरसेवक राजकुमार हंचाटे हे शिवसेनेच्या बैठकीसाठी विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात सकाळी 10 वाजता आले होते. मात्र, दोन तास होऊनही बैठक सुरु न झाल्याने त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या बैठकीला उपस्थिती लावली. या संदर्भात हंचाटे म्हणाले की, दोन तास उलटूनही शिवसेनेची बैठक सुरु न झाल्याने नाईलाजास्तव मी भाजपच्या बैठकीत सहभाग घेतला. लोकांची कामे होण्यासाठीच मी भाजपच्या बैठकीला उपस्थित होतो, असा खुलासाही त्यांनी केला.

हेही वाचा : दोन महिने कुठे गायब होतो..? प्रताप सरनाईकांनी दिले उत्तर...

भाजपने स्थायी समितीच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात, तर शिवसेनेने विरोधी पक्षनेते कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. भाजपच्या बैठकीस महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते शिवानंद पाटील, ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, श्रीनिवास करली, अविनाश बोमड्याल, नागेश भोगडे, रवी कय्यावाले, विनायक विटकर, नगरसेविका शशिकला बत्तुल, मेनका राठोड, जुगनबाई आंबेवाले, निर्मला तांबे, संगीता जाधव असे मोजकेच नगरसेवक उपस्थित होते. 

या वेळी उपायुक्त एन. के. पाटील, मुख्यलेखापाल शिरीष धनवे, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. भाजपच्या एकूण सदस्यांची संख्या 50 असताना पदाधिकारी वगळता केवळ 11 जणांनी हजेरी लावली. या बैठकीमध्ये कर, सहायक संचालक नगररचना, नगर अभियंता विद्युत, पशुसंवर्धन, प्राणिसंग्रहालय, क्रीडा, संगणक व एलबीटी आदी विभागांची माहिती घेण्यात आली.

थकीत कराच्या आकडेवारीत तफावत

या बैठकीत थकीत कराच्या आकडेवारीत घोळ असल्याचा आरोप सदस्यांनी केला. आयुक्त व अधिकाऱ्यांच्या आकडेवारीत तफावत असल्याचा सूर या सदस्यांनी आळविला. शहरात एक लाख 1 हजार 419 मिळकती, 15 हजार 844 खुल्या जागा, हद्दवाढमध्ये एक लाख 33 हजार 445 मिळकती, 55 हजार 467 खुल्या जागा तर गलिच्छ वस्ती सुधारणा विभागात 41 हजार झोपड्या आहेत. या सर्व विभागांमध्ये एकूण 238 कोटी रुपयांचा कर थकीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

महापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेचे सध्या 21 नगरसेवक आहेत. विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीला महेश कोठे, शहरप्रमुख तथा नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, विठ्ठल कोटा, प्रथमेश कोठे, भारत बडूरवाले असे केवळ पाच सदस्य उपस्थित होते. शिवसेनेने शिक्षण, परिवहन आदी विभागांची माहिती घेतली.

दरम्यान, पहिल्या दिवशीच्या बैठकीला पदाधिकारी वगळता सत्ताधारी भाजपचे 10, तर विरोधी पक्ष शिवसेनेचे केवळ 5 सदस्य उपस्थित होते. त्यामुळे बहुतांश सदस्यांना बजेटबाबत अनास्था असल्याचे दिसून आले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख