दोन महिने कुठे गायब होतो..? प्रताप सरनाईकांनी दिले उत्तर... - MLA Pratap Saranaik sets up Oxygen Plant in Mira Bhayandar-vd83 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

दोन महिने कुठे गायब होतो..? प्रताप सरनाईकांनी दिले उत्तर...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 22 जुलै 2021

त्यासाठी तज्ज्ञ कर्मचारी नियुक्त केले आहेत.

मीरा भाईंदर : ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात कोणत्याही नागरिकांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये; म्हणून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर शहरात ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प (प्लांट) उभारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी या प्लांटचे लोकार्पण होणार आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी आमदार सरनाईक कुठे आहेत? असा प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना आमदार सरनाईक यांनी ऑक्सिजन प्लांट व इतर आरोग्य सेवांची तयारी करून उत्तर दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सिजन प्लांटसोबतच इतरही अनेक आरोग्य सेवा लवकरच सुरु करण्यात येणार आहेत, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले. (MLA Pratap Saranaik sets up Oxygen Plant in Mira Bhayandar)

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार, महापालिकांकडून तयारी केली जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढल्याचे दिसून आले. पण, ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा प्रचंड प्रमाणात भासला होता. ही गरज लक्षात घेऊन प्रताप सरनाईक फाउंडेशन व विहंग चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हा प्लांट उभारण्यात आला आहे.

हेही वाचा : कुख्यात गुंडास कोरोना लस देण्याची शिफारस केली अन्‌ सरपंचाच्या हाती बेड्या पडल्या

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले असले तरी अद्यापही कोरोना कायमस्वरूपी हद्दपार झालेला नाही. अनेक रुग्णांचा ऑक्सिजन  न मिळाल्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत तज्ज्ञांकडून इशारे देण्यात येत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘मिशन ऑक्सिजन’च्या माध्यमातून राज्याला ऑक्सिजन पुरवठ्याबाबत स्वयंपूर्ण करण्याचे सांगितले होते. त्यामुळे आमदार प्रताप सरनाईक यांनी स्वतःच्या मतदारसंघात ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट उभारला आहे. 

या ऑक्सिजन प्लांटसाठी लागणारी सामग्री परदेशातून आणण्यात आली आहे. या प्लांटमधून २४ तासात १२० सिलिंडर ऑक्सिजन मिळणार आहे.  त्यासाठी आवश्यक ते ऑपरेटर व हेल्पर यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. या प्लांटमधून मिळणारा ऑक्सिजन नागरिकांना मोफत दिला जाणार आहे. रिकामे सिलिंडर घेऊन येणाऱ्या नागरिकांना भरलेले ऑक्सिजन सिलिंडर दिले जाणार आहेत. तसेच, ज्यांच्याकडे सिलिंडर नसेल त्यांना डिपॉझिट घेऊन विनामूल्य ऑक्सिजन सिलिंडर देण्याची ही योजना आमदार सरनाईक यांनी तयार केली आहे.  

कोरोना संपेपर्यंत ऑक्सिजन सेवा सुरु राहणार : सरनाईक

मीरा भाईंदर येथील माझ्या जनसंपर्क कार्यालयात हा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. या ऑक्सिजन प्लांटचे उदघाटन झाल्यानंतर मतदारसंघातील नागरिकांना मोफत ऑक्सिजन सिलिंडर देण्यास सुरुवात करणार आहोत. दररोज निर्माण होणाऱ्या ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा पालिका, सरकारी हॉस्पिटल तसेच गरज पडल्यास खासगी हॉस्पिट्लनाही केला जाईल. कोरोना पूर्णपणे हद्दपार होईपर्यंत व त्यानंतरही ऑक्सिजन सेवा सुरु राहणार आहे. हवेतून ऑक्सिजन निर्माण करून त्याचे फिल्टरेशन करून ते सिलिंडरमध्ये भरले जाणार आहे. त्यासाठी तज्ज्ञ कर्मचारी नियुक्त केले आहेत, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख