जयंत पाटील यांच्यापुढे तोंड कोण उघडणार?

त्यावेळीच काँग्रेसच्या काही नगरसेवकांना राष्ट्रवादी सत्तेत आपल्याला ‘भाव’ देणार का याची शंका होती?
Struggle for the existence of Congress in Sangli Municipal Corporation
Struggle for the existence of Congress in Sangli Municipal Corporation

सांगली : सांगली महापालिकेत (Sangli Municipal Corporation) काँग्रेसची (Congress) अस्तित्वासाठी धडपड सुरू आहे. उपमहापौर, विरोधी पक्षनेतेपद आणि सत्तेत भागीदारी इतक सगळं असूनही काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसचा (Nationalist Congress) कारभार सुरू आहे. सत्ता जरी काँग्रेस-राष्ट्रवादीची असली तरी यात काँग्रेसचे अस्तित्व दिसत नव्हते. त्यामुळेच बेडग रोड वरील महापालिकेच्या जैविक वैद्यकीय कचरा भस्मिकरण केंद्राच्या ठेक्यावरून काँग्रेसला आपले अस्तित्व दाखवण्याची वेळ आली आहे. (Struggle for the existence of Congress in Sangli Municipal Corporation)

सांगली महापालिकेत 2018 मध्ये प्रथमच भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमताने सत्तेत आला होता. मात्र त्यांना केवळ अडीच वर्षे सत्ता उपभोगता आली. अंतर्गत कुरघोड्या आणि त्यातून निर्माण झालेली नाराजीने पोखरलेल्या भाजपला राष्ट्रवादीने खिंडार पाडले आणि सत्ता हस्तगत केली. या सत्तेच्या खेळीत काँग्रेस फक्त राष्ट्रवादी सोबत होती, त्यामुळे आघाडीला सत्ता मिळाली. भाजपचे नगरसेवक फोडण्याचे इलेक्टिव्ह मेरिट राष्ट्रवादीने पटकावल्याने सहाजिकच महापौरपद त्यांच्याकडे गेले. त्यामुळे जास्त नगरसेवक मोठा भाऊ असलेल्या काँग्रेसला उपमहापौर पदावर समाधान मानावे लागले. अर्थात त्यावेळीच काँग्रेसच्या काही नगरसेवकांना राष्ट्रवादी सत्तेत आपल्याला ‘भाव’ देणार का याची शंका होती? सत्तांतरानंतरही विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच राहिले आहे. मात्र, काँग्रेसला विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक करत असल्याने आघाडीत बिघाडी होऊ लागली आहे.

सत्तांतरानंतर महापालिकेत बैठकांमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारीही सुरुवातीस दिसत होते. त्याच वेळी महापालिकेची सूत्रे कोण चालवणार, हे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे अनेक बाबतीत आपल्याला विचारात घेतले जात नाही, अशी कुरकुर काँग्रेसचे नगरसेवक करत होतेच. त्यांची अस्वस्थता जाणवत होती. पण, राष्ट्रवादी पुढे तोंड कोण उघडणार हा मुद्दा होता. मुळात या आघाडीमागे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. शिवाय ते पालकमंत्री असल्याने स्वाभाविकच तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असतानाही महापालिकेत राष्ट्रवादीचे पारडे जड झाले आहे. त्यातही काँग्रेसच्या नगरसेवकांना सक्षम नेत्याचे पाठबळ नसल्याने त्यांची गोची होत आहे. 

काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांचे बलाबल पाहिले तर काँग्रेसचे 19 आणि राष्ट्रवादीचे 15 सदस्य आहेत. सांगली शहरात राष्ट्रवादीचे कमी नगरसेवक आहेत. त्यामुळे सांगलीत आपली ताकद वाढवायची असेल, तर काँग्रेसला नामोहरम केले पाहिजे. याच राजकारणातून राष्ट्रवादीने काही महिन्यांपूर्वी शहरात इतर पक्षातून अनेकांचे इनकमिंग केले होते. काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांना राष्ट्रवादीत घेण्याचे प्रयत्न सध्यातरी विफल ठरले आहेत. पण, राष्ट्रवादीला सांगलीत ताकद वाढवायची असल्याचे सतत जाणवते. त्यामुळेच महापालिकेत काँग्रेसचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महापौर दिग्विजय सूर्यवंशी आघाडीचे महापौर आहेत, त्यांनी राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेसला विश्वासात घेऊन काम केले पाहिजे, अशी काँग्रेस नगरसेवकांची इच्छा आहे. पण तसे चित्र दिसत नसल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांनी नुकत्याच झालेल्या महासभेपूर्वी बेडग रोड वरील जैविक भस्मिकरण केंद्र मिरज आयएमएला देण्याच्या विषयाला विरोध करून आपल्याकडे लक्ष वेधले. या विरोधाला आणखी काही कंगोरे असण्याची शक्यता आहे. 

मात्र, सध्या तरी काँग्रेस नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा महापालिकेत एककल्ली कारभार सुरू असल्याचा ठपका ठेवत त्याला विरोध केला आहे. यातून आपले अस्तित्वही दाखवण्याची त्यांची धडपड सुरू आहे. पुढील अडीच वर्षात महापालिकेच्या निवडणुका येत असल्याने आतापासूनच आपली दखल घेतली जावी आणि आपले अस्तित्व टिकावे, यासाठी काँग्रेसची धडपड सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com