राष्ट्रवादीतील वाद पेटला; सुरेश घुलेंनी नेमलेल्या पक्षनिरीक्षकास विरोध; एका दिवसात स्थगिती

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील सुरु असलेली गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
Suresh Ghule .jpg
Suresh Ghule .jpg

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील सुरु असलेली गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा पक्षनिरीक्षक सुरेश घुले यांच्या सुचनेनुसार नियुक्त केलेले पंढरपूर तालुका पक्षनिरीक्षक संजय पाटील यांच्या निवडीला एकाच दिवसात स्थगिती देण्यात आली आहे. राष्ट्रवादी तालुका अध्यक्षपदाचा वाद सुरु असतानाच पक्ष निरीक्षकाच्या नियुक्तीला स्थगिती दिल्याने तालुका राष्ट्रवादीमध्ये पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे पदाधिकारी निवडीचा गोंधळ आणखी वाढला आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे. आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या येथील जागेवर त्यांचे पुत्र भगिरथ भालकेंना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली जात आहे. अशातच तालुका अध्यक्षपदाच्या निवडीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत.

दीपक पवार यांच्या जागी (कै) आमदार भारत भालके यांचे कट्टर समर्थ विठ्ठल कारखान्याचे संचालक विजयसिंह देशमुख यांची राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षपदी निवड केल्याने राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, जिल्हा राष्ट्रवादी युवक  काँग्रेसचे अध्यक्ष, अॅड. गणेश पाटील, शहर अध्यक्ष सुधीर भोसले, महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता पवार, यांच्यासह अनेक पदाधिकार्यांनी देशमुख यांच्या तालुका अध्यक्षपदाच्या निवडीवर अक्षेप घेत विधानसभा पोट निवडणुकीचे संभाव्य उमेदवार भगिरथ भालके यांच्या विरोधात उघड बंड पुकारले आहे.

पक्ष कार्यकर्त्यांच्या बंडाची दखल घेत, वरिष्ठ नेत्यांनी भालके विरोधातील बंड शमवण्यासाठी जिल्हा पक्ष निरीक्षक सुरेश घुले यांना पंढरपूरला पाठवण्यात आले होते. घुले यांनी पंढरपुरात येऊन कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतरही पाटील गट पवार यांच्या निवडीसाठी आग्रही होता. याच दरम्यान जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष व प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी जिल्हा निरीक्षक सुरेश घुले यांच्या सुचने नुसार संजय पाटील यांची तालुका पक्ष निरीक्षक म्हणून निवड केली होती. त्यानंतर लागलीच पाटील हे नाराज कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी  गुरुवारी (ता.4 मार्च) सकाळी पंढरपुरात दाखल झाले होते.

दिवसभर त्यांनी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. याच दरम्यान विरोधी गटाचे संजय पाटील यांच्यापक्ष निरीक्षक नियुक्तीला स्थगिती मिळावी यासाठी दिवसभर प्रयत्न सुरु होते. अखेर गुरुवारी रात्री संजय पाटील यांच्या पक्ष निरीक्षक निवडीला स्थगिती देण्यात आल्याचे पत्रक जिल्हा पक्ष निरीक्षक सुरेश घुले यांनी काढले. पक्ष पदाधिकारी निवडीच्या गदारोळामुळे कार्यकर्त्यांमध्ये संवाद साधून मनोमीलन करण्याच्या प्रक्रियेला ब्रेक लागला आहे.


परस्पर पदाधिकार्यांच्या निवडी करु नयेत.

सोलापूर जिल्ह्यात यापुढे पक्ष पदाधिकार्यांच्या निवडी करताना जिल्ह्याचे पालक मंत्री दत्ता भरणे आणि जिल्हा पक्ष निरीक्षक म्हणून सुरेश घुले यांची संमती घ्यावी, परस्पर निवडी करु नयेत अशा सूचना पक्ष निरीक्षक सुरेश घुले यांनी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बळीराम साठे यांना दिल्या आहेत. घुले यांनी तसे लेखी पत्र ही साठे यांना दिले आहे. त्यामध्ये पक्ष निवडीसंदर्भात सूचना दिल्या आहेत.

Edited By - Amol Jaybhaye   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com