2 मे रोजी महाविकास आघाडी सरकारला धक्का बसणार!

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यातील कोरोना परिस्थिती रोखण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे.
 Devendra Fadnavis .jpg
Devendra Fadnavis .jpg

पंढरपूर : देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यातील कोरोना परिस्थिती रोखण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळेच उठसूठ लॉकडाऊन केला जात आहे. महाराष्ट्रात लोकशाही नसून लॉकशाही आहे, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

फडणवीस यांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे सभा घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, आमदार प्रशांत परिचारक, खासदार रणजितसिंहजी नाईक निंबाळकर, माजी मंत्री सदाभाउ खोत, माजी मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते.

यावेळी प्रचारसभेतून जनतेशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर टीका केली. कोरोनामुळे वर्षभरापासून सभा घेण्याची सवय गेली आहे. दुर्देवाने ही पोटनिवडणूक लागली आहे. एका मतदारसंघाची ही पोटनिवडणूक असली तरी सरकारचा नाकर्तेपणा दाखवून देण्याची ही संधी मतदारांना मिळाली आहे. असे सांगतानाच देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यूही महाराष्ट्रात आहे. कष्टकरी, शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज न देता लॉकडाऊन केला जात आहे. पॅकेजशिवाय करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनला आमचा विरोध आहे.

भगवान बसवेश्वरांच्या स्मारकासाठी या सरकारने अर्थ संकल्पात काहीही तरतूद केली नाही. आम्ही या स्मारकासाठी तरतूद केली होती. त्यांना विचारल्यावर फक्त एकही पैसा कमी पडू देणार नाही, असे हे सरकार सांगत आहे. येत्या 2 मे रोजी पंढरपूरचा निकाल लागेल. त्याच दिवशी बंगाल आणि आसामचाही निकाल लागणार आहे. त्यावेळी देशामध्ये सर्वांनाच धक्का बसेल, तसाच धक्का महाविकास आघाडी सरकारलाही बसणार आहे, असा दावा फडणवीस यांनी केला. 

या सरकारने वीज कापणार नाही असे आश्वासन अधिवेशनाच्या सुरुवातीला दिले. अधिवेशन सुरू झाल्यानंतर या सरकारने लगेचच वीज तोडणी सुरू केली. एखाद्या गावात पाच लोकांनी वीज बिल भरले नाही, तर त्या गावचा ट्रान्सफार्मर काढला जात असून गावांना अंधारात लोटले जात आहे. त्यामुळे आज पंढरपूरच्या विकासाचे आश्वासन देणाऱ्या या सरकारला भुलून जाऊ नका. ठाकरे सरकार केवळ लबाड सरकारच नाही तर महावसुली सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.  
 
राज्य सरकारने कोरोना काळात बिल्डरांना पाच हजार कोटींची सूट दिली. कारण त्यांना बिल्डरांकडून मालपाणी मिळाले, सरकारचे आवतन म्हणजे लबाडाचे आवतन आहे. ते जेवल्याशिवाय काही खरे नाही. हे महाभाग पंढरपूरसाठी काहीही देणार नाहीत, त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा, असे आवाहनही त्यांनी केले. सावकारी पेक्षा जास्त सावकारी या सरकामध्ये सुरु आहे. मोगलांच्या काळात जिजिया कर होता तसी या सरकारच्या काळात वसुली सुरू आहे. 18 एप्रिल पासून पुन्हा हे सरकार शेतकर्यांची वीज कापणार आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com