शिवसेनेचे क्षीरसागर म्हणतात, 'मी कुठलाही आदेश लपविलेला नाही' 

पुरावे मिळाल्याने जातीच्या दाखल्यासाठी नवीन अर्ज सादर केल्याचेही क्षीरसागर यांनी समितीला सांगितले.
Nagnath Kshirsagar of Shiv Sena presented his statement before the Caste Certificate Verification Committee
Nagnath Kshirsagar of Shiv Sena presented his statement before the Caste Certificate Verification Committee

सोलापूर : माझ्याकडे यापूर्वी असलेल्या हिंदु खाटीक या अनुसुचित जातीच्या प्रमाणपत्रावर व वैधता प्रमाणपत्रावर सोलापूर जिल्हा जात पडताळणी समिती, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश मी लपविलेला नाही. माझ्या दाखल्याबद्दलची माहिती प्रांताधिकाऱ्यांना दिली. माझ्या जातीबद्दलचे नवीन पुरावे मला मिळाल्याने मी 27 जून 2014 रोजी पुन्हा हिंदू खाटीक जातीचा दाखला मिळविला. यामध्ये मी कोणाचीही दिशाभूल केली नाही अथवा माहिली लपविली नसल्याचे म्हणणे मोहोळचे शिवसेनेचे नेते नागनाथ क्षीरसागर यांनी गुरुवारी (ता. 18 मार्च) सादर केले. 

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार यशवंत माने यांचे बंधू हनुमंत माने यांनी नागनाथ क्षीरसागर यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल सोलापूरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर तक्रार केली आहे. या तक्रारीवर आज (ता. 18 मार्च) सुनावणी झाली.

त्यामध्ये क्षीरसागर यांनी वकिलांच्या माध्यमातून आज आपली बाजू समितीसमोर मांडली आहे. या प्रकरणावरील पुढील सुनावणी आता 8 एप्रिलला होणार आहे. दरम्यान आमदार यशवंत माने यांच्याकडे असलेल्या कैकाडी अनुसुचित जातीच्या दाखल्याच्या विरोधात नागनाथ क्षीरसागर यांचे चिरंजीव सोमेश क्षीरसागर यांनी तक्रार केली आहे. 

हनुमंत मानेंची तक्रार 

सोलापूरची जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने 2012 मध्ये नागनाथ क्षीरसागर यांच्याकडील हिंदू खाटीक जातीचा दाखला अवैध ठरविला आहे. अशी वस्तुस्थिती असताना नागनाथ क्षीरसागर यांनी आळजापूर (ता. बार्शी) येथील रहिवासी असल्याचे दर्शवून 27 जून 2014 रोजी पुन्हा हिंदू खाटीक या अनुसूचित जातीचा दाखला मिळाला. यामध्ये क्षीरसागर यांनी सक्षम अधिकाऱ्यांची संपूर्ण दिशाभूल करून दाखला मिळविला असून क्षीरसागर यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार हनुमंत माने यांनी सोलापूरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केली होती. 

क्षीरसागर यांचे म्हणणे 

माने यांनी केलेल्या तक्रारीवर क्षीरसागर यांनी समितीसमोर म्हणणे मांडले. नवीन जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपण 19 मार्च 2014 रोजी अर्ज करताना 2012 मध्ये जात पडताळणी समितीने जात वैधता प्रमाणपत्र फेटाळल्याबाबतची व पुनर्विचार याचिका न्यायालयात प्रलंबित असल्याचे कथन केले होते.

माझे पणजोबा, पणजोबांच्या बहिणी यांचे जन्म व मृत्यू दाखले, जातीच्या महसुली नोंदी याबाबतचे पुरावे आपल्याला मिळाल्याने जातीच्या दाखल्यासाठी नवीन अर्ज सादर केल्याचेही क्षीरसागर यांनी गुरुवारी समितीला सांगितले. या अर्जाची सविस्तर शहानिशा होऊन 27 जून 2014 रोजी आपल्याला हिंदू खाटीक या अनुसूचित जातीचा दाखला मिळाल्याचे क्षीरसागर यांनी आजच्या सुनावणीत म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com