ठाकरे-पवारांचे आभार मानताना संजयमामांनी व्यक्त केली ही खंत!   - Had such unity been shown at that time, the waters of Ujani would not have gone to Marathwada | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

ठाकरे-पवारांचे आभार मानताना संजयमामांनी व्यक्त केली ही खंत!  

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 27 मे 2021

त्यामुळे सोलापूरकरांच्या हक्काचे पाच टीएमसी पाणी वाचले आहे.

सोलापूर : उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांना पाणी देण्याचा निर्णय रद्द केल्याचा लेखी आदेश आज (ता. २७ मे) जलसंपदा विभागाने काढला आहे. हा निर्णय रद्द करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील विविध संघटना, उजनी पाणी बचाव संघर्ष समिती यांच्यासह करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे, माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे, मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, कल्याणराव काळे यांच्यासह इतर नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आंदोलन आणि लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा यामुळे जलसंपदा विभागाने आज हा महत्वपूर्ण आदेश काढला. त्यामुळे सोलापूरकरांच्या हक्काचे पाच टीएमसी पाणी वाचले आहे. (Had such unity been shown at that time, the waters of Ujani would not have gone to Marathwada : Sanjay Shinde) 

याबाबत आमदार संजय शिंदे म्हणाले की, मराठवाड्याला उजनीतून 21 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय 2004 मध्ये झाला. त्यातील सात ते साडेसात टीएमसी पाणी थेट उजनी धरणातून दिले जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध संघटना व राजकीय मंडळींनी इंदापूरला पाणी देण्याच्या विरोधात जशी एकजूट दाखविली, आंदोलने केली तशीच एकजूट मराठवाड्याला पाणी देताना दाखविली नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे 21 टीएमसी पाणी मराठवाड्याला जात आहे. इंदापूरला जाणाऱ्या पाण्याच्या विरोधात आता जशी आक्रमक भूमिका घेतली, तशीच आक्रमक भूमिका मराठवाड्याला पाणी देण्यासाठी घ्यायला हवी होती. आता आक्रमक भूमिका घेणारे त्यावेळी गप्प बसल्याने सोलापूर जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे परिणाम येत्या काळात दिसतील, अशी खंतही या वेळी आमदार शिंदे यांनी बोलून दाखवली. 

हेही वाचा :  छत्रपतींच्या जिल्ह्याची जबाबदारी हर्षवर्धन पाटलांकडे...

गेल्या आठवड्यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील शिष्टमंडळाला हा आदेश रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. आदेश रद्द करण्यासाठी तब्बल आठवड्याचा कालावधी लागल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. दरम्यान, इंदापूरच्या पाण्याचा आदेश 22 एप्रिलला काढलेले जलसंपदाचे उपसचिव वैजिनाथ चिल्ले हे तीन ते चार दिवस रजेवर होते. रजेचा कालावधी संपून आज ते कामावर आल्यानंतर त्यांनी इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द केल्याचा लेखी आदेश आज काढला. 

इंदापूरला उजनीतून पाणी देऊ नये, अशी सोलापूर जिल्ह्याची इच्छा होती. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याची मागणी व जनभावना विचारात घेऊन इंदापूरला पाणी देण्याचा आदेश रद्द केला आहे. त्याबद्दल सोलापूर जिल्ह्याच्या वतीने त्यांचे आभार.
- संजय शिंदे, आमदार 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख