पत्नीचा छळ करणाऱ्या भाजप आमदाराच्या कृत्याची महिला आयोगाकडून गंभीर दखल - Women Commission seeks report on complaint of lady officer | Politics Marathi News - Sarkarnama

पत्नीचा छळ करणाऱ्या भाजप आमदाराच्या कृत्याची महिला आयोगाकडून गंभीर दखल

वृत्तसंस्था
रविवार, 27 जून 2021

राज्य शासनाच्या सेवेत अधिकारी पदावर असलेल्या पत्नीचा छळ केल्याप्रकरणी भाजप आमदारावर चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे.

नवी दिल्ली : राज्य शासनाच्या सेवेत अधिकारी पदावर असलेल्या पत्नीचा छळ केल्याप्रकरणी भाजप आमदारावर चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे. काँग्रेसने त्यांच्या अटकेची जोरदार मागणी केली आहे. तर भाजपनेही राज्य सरकार याप्रकरणात कोणताही हस्तक्षेप करणार नसल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगानंही घेतली आहे. (Women Commission seeks report on complaint of lady officer)

हिमाचल प्रदेशातील धरमशालाचे भाजप आमदार विशाल नेहरिया यांच्याविरोधात पत्नी ओशीन शर्मा (Oshin Sharma) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांनी आमदार पती व कुटूंबियांवर मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. याबाबत माहिती देणारा 11 मिनिटांचा व्हिडिओ तयार केला असून तो सोशल मीडियात व्हायरल झाला आहेत. ओशीन या हिमाचल प्रदेश प्रशासकीय सेवेतील (HPAS) 2020 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. 

हेही वाचा : लबाड लांडगं ढोंग करतंय, मी पुन्हा येईनचं सोंग करतंय!

ओशीन यांचा व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल झाल्यानंतर हिमाचल प्रदेश महिला आयोगानं स्वत:हून या प्रकरणाची दखल घेतली आहे. कांगडा जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक विमुक्त रंजन यांना आयोगानं पत्र लिहिलं असून तातडीनं या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. आयोगानं स्वत:हून या प्रकरणाची दखल घेतल्यानं नेहरिया यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच काँग्रेसने नेहरिया यांच्या अटकेची मागणी केली आहे. त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणीही काँग्रेसने लावून धरली आहे. तर भाजपने हा नेहरिया यांचा कौटूंबिक कलह असल्याने राज्य सरकार त्यात हस्तक्षेप करणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान, नेहरिया व ओशीन या दोघांचा विवाह दोन महिन्यांपूर्वी 26 एप्रिल रोजी झाला आहे. नेहरिया 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झाले आहेत. लग्न झाल्यानंतर पतीने चौथ्याच दिवशी आपल्याला घरातून बाहेर काढले. त्यावेळी आपण कोरोनाबाधित होतो. स्वत:चं काहीतरी बरं-वाईट करून घेण्याची धमकी दिल्यानं आपण पुन्हा घरी आल्याचा दावा ओशीन यांनी केला आहे. 

दोघे एकमेकांना महाविद्यालयांपासून ओळखत होते. त्याकाळात नेहरिया यांच्याकडून मारहाण व्हायची, त्यामुळं आमच्यातील संबंध त्याचवेळी तुटले होते. पण 2019 मध्ये नेहरिया यांनी आमदार झाल्यानंतर ओशीन यांना 2019 मध्ये लग्नाची मागणी घातली. ते प्रामाणिकपणे आपल्याशी वागतील, या उद्देशाने लग्नाला होकार दिल्याची माहिती ओशीन यांनी दिली. सासरच्यांनी हुंड्याचीही मागणी केली. आपल्या पालकांनी लग्नावेळी त्यांना 1 लाख 20 हजारांची सोन्याची चैन तसंच एक लाख रुपयांची अंगठी दिली आहे, असंही ओशीन यांनी सांगितलं. 

नेहरिया यांनी मात्र, पत्नीने केलेला आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी कांगडा जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक विमुक्त रंजन यांच्यासमोर आपली बाजू मांडली. लग्नाआधीच आमच्यामध्ये मैत्री होती. पण लग्नानंतर काही दिवसांतच ओशिनने कुटूंबियांवर मानसिक दबाव टाकण्यास सुरूवात केली. अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला. ही बाब घरापर्यंत सीमित ठेवली. अजूनही घरातील बाबी घरातच राहायला हव्यात, यासाठी प्रयत्न करत असल्याचे नेहरिया यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख