मी लवकरच परत येईन! शशिकलांचे 'कमबॅक'चे संकेत - Sasikala may come back in Tamilnadu politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

मी लवकरच परत येईन! शशिकलांचे 'कमबॅक'चे संकेत

वृत्तसंस्था
सोमवार, 14 जून 2021

तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकांआधी निवृत्ती घेतल्याची घोषणा शशिकला यांनी केली होती.

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता (Jaylalitha) यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही. के. शशिकला या तमिळनाडूच्या राजकारणात पुन्हा सक्रीय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे अण्णाद्रमुकमधील (AIDMK) नेत्यांमधील अस्वस्थता वाढल्याचे बोलले जात आहे. तमिळनाडूतील विधानसभेच्या निवडणुकीतून शशिकला यांनी माघात घेतल्याने त्या आता राजकारणातून निवृत्त होणार अशीच चर्चा होती. पण कोरोना महामारी संपल्यानंतर पुन्हा राजकारणात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. (Sasikala may come back in Tamilnadu politics)

तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकांआधी 3 मार्चला राजकारणातून निवृत्ती घेतल्याची घोषणा शशिकला यांनी केली होती. राज्यातील अण्णाद्रमुकची सत्ता गेल्यानंतर त्या पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसते. त्यांचे व अण्णाद्रमुकमधील पदाधिकाऱ्याचे फोनवर झालेल्या बोलण्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर ही बाब पुढे आली आहे. त्यामुळं अण्णाद्रमुकमधील नेत्यांमध्येही अस्वस्थता वाढू लागली आहे. अण्णाद्रमुकमध्ये आजही शशिकला यांना मानणारा मोठा गट आहे. त्या तुरूंगातून आल्यानंतर स्वागतासाठी झालेली गर्दी त्यावेळी पक्षातील नेत्यांना धक्का देणारी होती. 

हेही वाचा : मोठा धक्का : गौतम अदानींचे तासाभरातच तब्बल पाऊण लाख कोटी बुडाले

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमध्ये शशिकला या आपण परत येणार असल्याचे संकेत देतात. 'चिंता करू नका, मी पक्षातील समस्या लवकरच दूर करेन. सगळ्यांनी धीट बनवा. कोरोना महामारी संपल्यानंतर मी परत येईन,' असे त्या अण्णाद्रमुकच्या पदाधिकाऱ्याशी बोलताना म्हणाल्या. त्यावर त्या पदाधिकाऱ्यानेही आम्ही तुमच्या पाठिशी राहू, असे आश्वासनही त्यांना दिले. या ऑडिओ क्लीपमुळे पक्षातील त्यांचे समर्थक सक्रीय झाल्याची चर्चा असून लवकरच वेगाने घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

कोण आहेत शशिकला?

जयललिता यांच्या निधनानंतर शशिकलांनी पनीरसेल्वम यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा घेतला होता. नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. 

शशिकलांच्या सुटकेनंतर त्यांना पक्षात न घेण्यास मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांचा सर्वांत जास्त विरोध होता. पलानीस्वामी हे सरकारचे नेतृत्व करीत आहेत तर पनीरसेल्वम हे पक्षाचे नेतृत्व करीत आहेत. काही दिवसांपूर्वी पनीरसेल्वम यांनी शशिकलांना पुन्हा एकदा पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते. यामागे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष अडचणीत आल्याचे कारण आहे. मात्र, शशिकलांनी याला कोणताही प्रतिसाद दिला नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख