मोठा धक्का : गौतम अदानींचे तासाभरातच तब्बल पाऊण लाख कोटी बुडाले

शेअर बाजारात आणखी एक घोटाळा सुरू असल्याचे संकेत सुचेता दलाल यांनी दिले होते.
Gautam Adani loses 10 billion dollares amid crisis in stock market
Gautam Adani loses 10 billion dollares amid crisis in stock market

मुंबई : आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले अदानी ग्रुपचे (Adani Group) प्रमुख गौतम अदानी यांच्यासाठी सोमवारची सकाळ धक्कादायक ठरली आहे. त्यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या तीन कंपन्यांची खाती गोठवल्याच्या बातमीने शेअर बाजारात (Share Market) एकच खळबळ उडाली. त्यामुळं अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअरची किंमती गडगडली. परिणामी तासाभरात अदानींना तब्बल पाऊण लाख कोटींचे नुकसान सहन करावे लागले. (Gautam Adani loses 10 billion dollars amid crisis in stock market)

हर्षद मेहता घोटाळा उघडकीस आणलेल्या सुचेता दलाल यांनी शनिवारी एक ट्विट केलं होतं. शेअर बाजारात आणखी घोटाळा सुरू असल्याचे संकेत त्यांनी दिले होते. त्यांनी शनिवारी हे ट्विट केल्यानंतर सोमवारी पहिल्यांदाच बाजार उघडला अन् अदानी ग्रुपमधील पाच कंपन्यांमधील शेअर्स 5 ते 25 टक्क्यांनी घसरले. अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये 24.99 टक्के घट होत ते 1201 रुपयांवर स्थिरावले. या शेअरची किंमत आधी 1601.45 रुपये एवढी होती. 

अदानी पोर्ट्सच्या शेअरमध्ये 18.75 टक्क्यांनी घट होत 681 रुपयांवर आले. अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी पॅावर या कंपन्यांचे शेअरही प्रत्यकी पाच ट्क्क्यांनी घसरले.  सर्वच कंपन्यांचे शेअर कमी झाल्याने पहिल्या तासातच सुमारे पाऊण लाख कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. त्यानंतर काही प्रमाणात शेअरचे भाव वाढल्याचे दिसून आले. 

सुचेता दलाल यांनी काय म्हटलंय ट्विटमध्ये?

'आणखी एक घोटाळा जो सिध्द होणं कठीण आहे. सेबीच्या ट्रॅकिंग सिस्टीमकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या बाहेर असलेला हा घोटाळा आहे. एका समूहाच्या मूल्यांत सातत्याने हेराफेरी केली जात आहे. परदेशी कंपन्यांमार्फत हे सुरू आहे. हे याचं वैशिष्टय आहे. काहीच बदललेलं नाही,' असं ट्विट दलाल यांनी केलं आहे. त्यांच्या ट्विटने हर्षद मेहता घोटाळ्याची आठवण करून दिली. 

तीन गुंतवणूकदारांची खाती गोठवली

प्रसिध्द उद्योगपती गौतम अदानी अडचणीत आले आहेत. अदानी ग्रुपमध्ये करण्यात आलेली 43 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ही गुंतवणूक करणाऱ्या तीन बड्या गुंतवणूकदारांची खाती नॅशनल सिक्युरिटीज डिपॅाझिटरी लिमिटेड (NSDL) ने गोठवली आहे. ही बातमी शेअर बाजारात पसरल्यानतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स जवळपास 25 टक्क्यांनी कोसळल्याने अदानींना मोठा झटका बसला आहे. 

अब्दुला इन्व्हेस्टमेंड फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंड फंड या तीन परदेशी फंडांची खाती गोठवण्यात आल्याचे समजते. ही कारवाई 15 दिवसांपूर्वीच झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत आज शेअर बाजारात ही माहिती पसरल्याने खळबळ उडाली. या तीन कंपन्यांची अदानी गुपमध्ये 43 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. मालकी हक्क आणि लाभार्थ्यांची माहिती लपवल्याने या कंपन्यांची खाती गोठवण्यात आल्याने त्यांना शेअरची खरेदी-विक्री करता येणार नाही. 

तीन बड्या गुंतवणूकदारांवर झालेल्या या कारवाईने अदानी यांना मोठा झटका बसला आहे. अदानी यांच्या सहापैकी पाच कंपन्यांच्या शेअरमध्ये आज ऐतिहासिक घसरण झाली. अदानी एंटरप्रयाझेस, अदानी ग्रीन्स, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रांसमिशन आणि अदानी पोर्टस् या कंपन्याच्या शेअरमध्ये मोठी घसरण नोंदविली गेली आहे. हे शेअर्स रेड झोनमध्ये म्हणजे त्याला लोअर सर्किट लावण्यात आले आहे. 

तीन गुंतवणूकदारांवर मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 'एनएसडीएल'कडून या कंपन्यांकडे मालकी हक्काबाबतची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. पण त्याला योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची खाती गोठवली आहेत. अदानी ग्रुपसाठी हे तीन गुंतवणूकदार मोठे असल्याने आता त्यांच्यावरच कारवाई झाल्याने अदानी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com