शरद पवारांची 'पॅावरफुल' दिल्लीवारी; प्रशांत किशोरांच्या भेटीनंतर थेट विरोधकांची बैठक - Opposition leaders meeting to be held at Sharad Pawars residence | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

शरद पवारांची 'पॅावरफुल' दिल्लीवारी; प्रशांत किशोरांच्या भेटीनंतर थेट विरोधकांची बैठक

वृत्तसंस्था
सोमवार, 21 जून 2021

शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी दुपारी चार वाजता बैठक होणार आहे.

नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत दाखल झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोमवारी त्यांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली. मागील दहा दिवसांतील ही त्यांची दुसरी भेट आहे. तर मंगळवारी देशातील विरोध पक्षातील नेत्यांची बैठक पवारांच्या दिल्लीतील घरी होणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही देशातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व प्रभारींची बैठक बोलवल्याने राजकीय तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. (Opposition leaders meeting to be held at Sharad Pawars residence)

काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी मुंबईत शरद पवारांची घरी जाऊन भेट घेतली होती. ही सदिच्छा भेट असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता. पण दहा दिवसानंतर दोघांमध्ये पुन्हा बैठक झाल्याने भेटीवरून तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. या भेटीनंतर शरद पवार व तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांच्या माध्यमातून उद्या विरोधी पक्षांची बैठक बोलावण्यात आली आहे. सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्र मंचमार्फत ही बैठक होत आहे.

शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी दुपारी चार वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला आप, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष यांसह विविध 15 पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते. त्यामुळं या बैठकीवर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या बैठकीत तिसऱ्या आघाडीवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिगर भाजप व बिगर काँग्रेस पक्षांच्या नेत्यांचा या बैठकीत सहभाग असल्याची माहिती पुढे येत आहे. 

हेही वाचा : अनिल देशमुखांना वाझेशी थेट संपर्क ठेवण्याची गरज काय? सीबीआयचा खोचक सवाल

दिल्लीत या घडामोडी सुरू असताना सोनिया गांधी यांनीही 24 तारखेला बैठकीचे आयोजन केलं आहे. यामध्ये पक्षाच्या कार्यकारिणीचे सरचिटणीस सर्व राज्यांचे प्रभारी तसेच प्रदेशाध्यक्षांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. देशातील राजकीय स्थिती तसेच इंधन दरवाढ, महागाई आदी मुद्यांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते. त्यामुळं पवार यांचा दिल्ली दौरा सुरू झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या झालेल्या भेटीबाबत ते बोलत होते.

प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे, याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांना दिली. देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची इच्छा पवारांची आहे. ती त्यांनी बोलून दाखवली आहे, असे मलिक यांनी स्पष्ट केलं होतं. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते. मात्र तब्येतीमुळे त्यांना जाता आले नाही. परंतु देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत. भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल, अशी स्पष्ट भूमिका नवाब मलिक यांनी मांडली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख