ट्विटरवर बंदी घालत या देशानं उघडलं भारतीय 'कू'वर खातं - Official handle of the Government of Nigeria on koo | Politics Marathi News - Sarkarnama

ट्विटरवर बंदी घालत या देशानं उघडलं भारतीय 'कू'वर खातं

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 जून 2021

नवीन नियमांवरुन ट्विटर (Twitter) आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरु आहेत.

नवी दिल्ली : भारतामध्ये समाज माध्यमांसंदर्भातील नवीन नियमांवरुन ट्विटर (Twitter) आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरु आहेत. त्यातच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या ट्विटर हॅण्डलसमोरील ब्लू टीक हटवल्याने या वादात पुन्हा एकदा नवी ठिणगी पडली. एका देशाच्या राष्ट्राध्यक्षांचेच ट्विट डिलीट केल्याचा प्रकारही समोर आला होता. या देशाने थेट ट्विटरवर बंदी घालत हिसका दाखवला. त्यानंतर आता या देशाने भारतीय 'कू'वर खातं उघडलं आहे. (Official handle of the Government of Nigeria on koo) 

नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षांचेच ट्विट डिलीट केल्याने नायजेरियन सरकारने ट्विटरवर अमर्यादित कालावधीसाठी बंदी घातली आहे. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद्दू बुहारी यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत ट्विटरने त्याच्या हॅण्डलवरील ट्विट डिलीट केले होते. या साऱ्या गोंधळामध्ये नायजेरियामध्ये ट्विटरची जागा घेण्याचा प्रयत्न 'कू' ही भारतीय कंपनी करत आहे. त्याला आता यशही मिळताना दिसत आहे. 

हेही वाचा : देशात एका दिवसांत कोरोनाचे विक्रमी सहा हजार बळी! लाट ओसरत असताना असं का घडलं?

नायजेरियन सरकारने आपले अधिकृत खातं 'कू' वर उघडलं आहे. कूचे मुख्य कार्यकारी अधिकारी अप्रमेय राधाकृष्ण यानी ट्विटरवरूनच ही माहिती दिली आहे. नायजेरियन सरकारच्या खात्याचा स्क्रीनशॅाटही त्यांनी ट्विट केला आहे. हे खातं अधिकृत झाल्याची पिवळी टिक देण्यात आली आहे. नायजेरियातील एका कार्यक्रमाची माहिती देणार पहिलं ट्विट त्यावर करण्यात आलं आहे. 

ट्वीटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अकाऊंटवरील ब्लू टिक हटवली होती. याबाबत माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरकडे नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणी ट्विटरवर योग्य कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला होता. त्यानंतर ट्विटरने आपली चूक दुरुस्त केली.  टि्वटरने केवळ व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर हॅण्डलवरीलच ब्लू टिक काढलेली नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विटरने 'ब्लू टिक' काढला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांच्या खात्यावरील ब्लू टिक काढून टाकली असल्याचे संघाचे राजीव तुली यांनी म्हटले होते. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख