देशात एका दिवसांत कोरोनाचे विक्रमी सहा हजार बळी! लाट ओसरत असताना असं का घडलं? - Bihar death toll increased due to negligence in reporting | Politics Marathi News - Sarkarnama

देशात एका दिवसांत कोरोनाचे विक्रमी सहा हजार बळी! लाट ओसरत असताना असं का घडलं?

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 जून 2021

देशात कोरोना रुग्ण आणि मृतांची संख्या कमी होत असताना बुधवारी झालेल्या मृत्यूने सगळेच हादरून गेले.

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून देशातील कोरोनाची (Covid-19) लाट ओसरत असून दैनंदिन रुग्ण संख्या तसेच मृतांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. पण बुधवारी देशातील मृतांच्या आकड्याने विक्रम केला. एकाच दिवशी 6 हजार 138 मृत्यूची नोंद झाली. अचानक वाढलेला हा मृत्यूचा आकडा गोंधळात टाकणार होता. कारण आतापर्यंत देशात एकाच दिवशी सर्वाधिक मृत्यू 4 हजार 529 एवढे झाले होते. (Bihar death toll increased due to negligence in reporting)

देशात कोरोना रुग्ण आणि मृतांची संख्या कमी होत असताना बुधवारी झालेल्या मृत्यूने सगळेच हादरून गेले. ही वाढ बिहारमुळे झाल्याचे समोर आले. बिहारमध्ये एकाच दिवशी बुधवारी 3 हजार 951 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. पण त्याचा खुलासा नंतर झाला. हे मृत्यू एकाच दिवशी झालेले नाहीत. बिहारमध्ये मागील काही दिवसांतील मृत्यूची नोंदच झाली नसल्याचे समोर आले होते. ही वाढ नियमित मृत्यूच्या तुलनेत तब्बल 64 टक्क्यांहून अधिक होती.

हेही वाचा : योगगुरू रामदेव बाबांना आता नेपाळचाही झटका!

बिहारमधील आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी 18 मे रोजी एक समिती नेमली होती. या समितीने राज्यातील मृत्यूच्या आकड्याचे ऑडिट केले. त्यामध्ये 72 टक्के मृतांची नोंद झालीच नसल्याचे स्पष्ट झाले. बुधवारी सचिवांनी 3 हजार 951 मृतांविषयी माहिती दिली. पण हे मृत्यू कधी झाले आहेत, याची माहिती त्यांनी दिली आहे. बिहारमध्ये पहिल्यांदाच मृतांच्या आकड्यामध्ये दुरूस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे यातील काही मृत्यू कोरोनाच्या पहिल्या लाटेतही झालेले असू शकतात. 

बिहारमध्ये मृतांचा एकूण आकडा आता 9 हजार 429 वर पोहचला आहे. त्यामुळे या क्रमवारीत बिहार 16 वरून 12 व्या स्थानावर पोहचले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. मृत्यूदर 0.76 टक्क्यांवरून 1.32 टक्क्यांवर पोहचला. देशाच्या मृत्यूदरातही त्यामुळे किंचितशी वाढ झाली. 

महाराष्ट्रातील आकडे सातत्याने अद्ययावत

देशात सर्वाधिक एक लाखांहून अधिक मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून मृतांचे आकडे सातत्याने अद्ययावत केले जातात. मागील वर्षी मे महिन्यापासूनच ही प्रक्रिया राबविली जाते. त्यामुळे बहुतेक मृत्यूची अचूक नोंद होते. आठवडा किंवा महिन्याच्या अखेरीस तसेच दैनंदिन आकड्यांमध्येही उपलब्ध माहितीनुसार बदल केला जातो. रोजच्या मृत्यूमध्येही आठवडाभरातील मृतांची नोंद असू शकते. महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांमध्येही हीच पद्धत अवलंबली जाते. पण बिहारमध्ये 24 तासांतील मृत्यूच ग्राह्य धरले जात होते. एखाद्या मृत्यूची नोंद या 24 तासांत झाली नाही तर नंतरही त्याची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे मृतांचा आकडा कमी दिसत होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख