मेट्रोमॅन श्रीधरन भाजपच्या वाटेवर; निवडणुकही लढवणार... - Metro man E Sreedharan to join BJP | Politics Marathi News - Sarkarnama

मेट्रोमॅन श्रीधरन भाजपच्या वाटेवर; निवडणुकही लढवणार...

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

आगामी विधानसभा निवडणुकीत श्रीधरन यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली : दिल्लीपासून कोचीपर्यंत मेट्रो सेवेने देशाला जोडण्यात महत्वाची भूमिका बजावलेले ई श्रीधरन वयाच्या ८८ व्यावर्षी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. श्रीधरन यांना मेट्रोमॅन म्हणूनही ओळखले जाते. केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

केरळसह पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम या राज्यांमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणुक होणार आहे. त्यासाठी भाजपसह काँग्रेस व इतर पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रसिध्द व्यक्तींना आपल्या पक्षाकडे खेचण्यासाठी चढाओढ लागली आहे. 

केरळ भाजपने श्रीधरन यांचा भाजपमधील प्रवेश निश्चित झाल्याचे जाहीर केले आहे. पक्षाच्या २१ फेब्रुवारीला होणाऱ्या विजय यात्रेत ते अधिकृतपणे प्रवेश करतील, अशी माहिती केरळ भाजपचे प्रमुख सुरेंद्रन यांनी दिली. देशातील मेट्रो सेवा सुरू करण्यात श्रीधरन यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे. यासाठी त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले आहे. ते दिल्ली मेट्रोचे प्रमुख होते. डिसेंबर २०११ मध्ये तिथून ते निवृत्त झाले. देशात आधुनिक परिवहन सेवा उभी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

हेही वाचा : भाजप उमेदवाराच्या घरात २० मतं अन् मिळाली ९ मतं...

भाजपमध्ये जाण्याचा निर्णय अचानक घेतला नसल्याचे श्रीधरन यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. मी मागील दहा वर्षांपासून केरळमध्ये आहे. या राज्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. मी एकटा हे करू शकत नाही. भाजप वेगळा पक्ष असल्याने मी जाण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

श्रीधरन हे ८८ वर्षांचे असून त्यांनी मेट्रो प्रकल्पांसाठी भाजप सरकारला अनेकदा सल्ला दिला आहे. आता हे थांबवून भाजपच्या विविध उपक्रमांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे श्रीधरन यांनी सांगितले. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख