भाजप उमेदवाराच्या घरात २० मतं अन् मिळाली ९... काँग्रेसवर आरोप - BJP Candidate gets 9 vote despite 20 votes in family | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप उमेदवाराच्या घरात २० मतं अन् मिळाली ९... काँग्रेसवर आरोप

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपासह सर्वच विरोधी पक्षांनी धूळ चारली.

चंदीगढ : पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपासह सर्वच विरोधी पक्षांनी धूळ चारली. खासदार सनी देओल यांच्या लोकसभा मतदारसंघातील गुरूदासपूर नगरपालिकेत भाजपला खातेही खोलता आले नाही. याच नगरपालिकेत भाजपच्या एका महिला उमेदवाराला केवळ नऊ मतं मिळाली आहेत. 

पंजाबमध्ये काल मतमोजणी झाली असून गुरूदासपूर मतदारसंघातील सर्व २९ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपला आपल्यास खासदाराच्या मतदारसंघात खातेही खोलता न आलेल्या नामुष्की ओढवली आहे. खासदार सनी देओल आणि लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारातील आरोपी दीप सिध्दू यांची छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर ही निवडणूक झाली आहे. तसेच शेतकरी आंदोलनाचा फटकाही भाजपला बसल्याचे बोलले जात आहे.

गुरूदारपूर नगरपालिकेतील वॉर्ड क्रमांक १२ मध्ये भाजपकडून किरण कौर या उमेदवार होत्या. त्यांना केवळ नऊ मतं मिळाली आहेत. तर त्यांच्या घरात २० मतं असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, माझ्या कुटूंबातील १५ ते २० जणांनी मला मतदान केले होते. तरीही केवळ नऊ मते मिळाली. माझ्या शेजारील सर्वांनी मला मतदान करण्याचे आश्वासन दिले होते. पण मला कुणाचेच मतदान झाले नाही. आमच्या सह्याही खोट्या होत्या. 

कौर यांनी काँग्रेस नेत्यांवर आरोप केले की, काँग्रेसकडून माझ्या कुटूंबाला त्रास दिला जात आहे. माझ्या पतीची गाडी हटविण्यात आली. मला शाळेतून काढण्यात आले. तसेच काँग्रेसने उमेदवारी सोडण्यास दबाव टाकला होता. पण मी निवडणूक लढले. मी जिंकले असते. पण काँग्रेसने रात्रीच मतदान यंत्रात बदल करून काँग्रेसच्या बाजूने मतदान केले, असा गंभीर आरोपही कौर यांनी केला आहे. 

सात महापालिकांमध्ये काँग्रेसला बहुमत

पंजाबमधील सात महापालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. बठिंडा, अबोहर, बटाला, होशियारपूर, कपूरथला, पठाणकोट, मोगा या महापालिकांवर काँग्रेसने झेंडा फडकावला आहे. बठिंडा महापालिका ५३ वर्षांनंतर काँग्रेसच्या ताब्यात आली आहे. मोहाली महापालिकेची मतमोजणी सध्या सुरू असून त्यातही काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसते. 

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख