राजनाथसिंह अन् गडकरींसह विमानाचं महामार्गावरच 'इमर्जन्सी लँडिंग'

देशात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. राजस्थानमधील महामार्ग क्रमांक 925ए वर हा थरार पाहायला मिळाला.
Emergency landing of aircraft on highway in Rajasthan
Emergency landing of aircraft on highway in Rajasthan

नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह (Rajnath Singh) आणि रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) बसलेल्या हवाई दलाच्या विमानाचं गुरूवारी महामार्गावरच 'इमर्जन्सी लँडिंग' करण्यात आलं. देशात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. राजस्थानमधील महामार्ग क्रमांक 925ए वर हा थरार पाहायला मिळाला. पण घाबरू नका, हा एक प्रात्यक्षिकाचा भाग होता. महामार्गावर पहिल्यांदाच तयार करण्यात आलेल्या आपत्कालीन धावपट्टीचं लोकर्पण या 'इमर्जन्सी लँडिंग'नं करण्यात आलं. (Emergency landing of aircraft on highway in Rajasthan)

देशात पहिल्यांदाच महामार्गावर आपत्कालीन धावपट्टी तयार करण्यात आली आहे. हवाई दलाची सर्वप्रकारची विमानं या धावपट्टीवर उतरणार आहेत. राजनाथसिंह व गडकरी यांना घेऊन हर्क्युलस C-130J हे विमान या धावपट्टीवर उतरवण्यात आलं. महामार्गावरील सट्टा ते गंधव या भागात साडे तीन किलोमीटरची ही धावपट्टी आहे. केवळ आपत्कालीन स्थितीतच या धावपट्टीचा उपयोग केला जाणार आहे. इतरवेळी अन्य वाहतुकीसाठी हा मार्ग खुला असेल. 

ही धावपट्टी आंतरराष्ट्रीय सीमेजवळील महामार्गावरच असल्यानं सुरक्षेच्यादृष्टीने त्याचा खूप फायदा होणार आहे. भारतीय लष्कराला निगराणी तसेच पायाभूत सुविधा वेगाने उभारण्यासाठी या धावपट्टीचा उपयोग होणार आहे. या धावपट्टीप्रमाणेच कुंदनपुरा, सिंघानिया आणि बक्सर या गावांमध्ये तीन हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. पश्चिम आंतरराष्ट्रीय सीमेवर लष्करीचं नेटवर्क सक्षम करण्यासाठी हे महत्वाचं ठरणार आहे. 

ऑक्टोबर 2017 मध्ये भारतीय हवाई दलानं लढाऊ व प्रवासी विमान लखनऊ-आग्रा महामार्गावर उतरवलं होतं. त्यावेळी धावपट्टी तयार करण्यात आलेली नव्हती. महामार्गांचा उपयोग विमानं उतरवण्यासाठी होऊ शकतं, हे दाखवण्यासाठी हे मॉक ड्रील करण्यात आलं होतं. त्यानंतर देशभरातील महामार्गांवर आपत्कालीन धावपट्टी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. राजस्थानमधील पहिली धावपट्टी 19 महिन्यांत उभारण्यात आली आहे. 

केवळ युध्दकाळातच नव्हे तर नैसर्गिक आपत्तीच्या काळातही अशा धावपट्टीचा उपयोग होणार असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी महामार्गांवर केवळ रिक्षा, कार, ट्रॅक्टर धावत होते. आता विमानंही उतरणार आहेत. विविध मंत्रालयं व विभागांमधील समन्वयाचं हे उत्तर उदाहरण असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com