उत्तर प्रदेशमध्ये योगींना धक्का; अखिलेश यादव यांची जोरदार टक्कर

गोरखपूर मतदारसंघासह पंतप्रधान नरेंद्र मोदीचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्येही भाजपला अपेक्षित यश मिळालेले नाही.
Up Election SP defeat bjp in many districts in panchayat election
Up Election SP defeat bjp in many districts in panchayat election

लखनऊ : उत्तर प्रदेशात झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये (UP Election) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aditynath) यांना झटका बसला आहे. त्यांच्या गोरखपूर मतदारसंघासह पंतप्रधान नरेंद्र मोदीचा (PM Modi) मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्येही भाजपला अपेक्षित यश मिळालेले नाही. या निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षाने भाजपला जोरदार टक्कर देत सर्वाधिक जागा (UP Election Result) जिंकल्या आहेत. 

उत्तर प्रदेशमध्ये 58 हजार 189 ग्रामपंचायत, 75 हजार 855 पंचायत समिती सदस्य आणि 75 जिल्हा परिषदांमधील 3 हजार 51 सदस्यांसाठी नुकत्याच निवडणुका झाल्या. या निवडणुकांची मतमोजणी रविवारी सुरू झाली होती. जवळपास तीन दिवस ही मतमोजणी सुरू होती. आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपला अनेक महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. 

जिल्हा परिषदेच्या एकून सदस्यांपैकी समाजवादी पक्षाला 747 जागा मिळाल्या आहेत. तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहे. भाजपचे 690 उमेदवार निवडून आले आहेत. समाजवादीचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकदलाला 36 जागा मिळाल्याने आघाडीचा एकूण आकडा 783 वर पोहचला आहे. तसेच अनेक जिल्हा परिषदांमध्ये सपाने बहुमत मिळवले आहे. तर काही ठिकाणी अपक्षांच्या मदतीने सत्तेत येण्याची चिन्हं आहेत. 

योगी सरकारच्या अजेंड्यावर असलेल्या बुंदेलखंडमध्येही भाजपचा करिष्मा दिसला नाही. या भागात पाच जिल्हे असून एकूण 148 जागा आहेत. त्यामध्ये भाजपला सर्वाधिक 44 जागा मिळाल्या असल्या तरी सपानेही 34 जागा मिळवत दुसरे स्थान पटकावले आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात सपा व आरएलडीच्या आघाडीने भाजपचे नुकसान केले आहे. तसेच या भागात शेतकरी आंदोलनाचाही परिणाम दिसून आला. आघाडीला या भागात 76 जागा मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. 

पुर्वांचलमध्येही सपाची सायकल धावली

पूर्वांचल हा मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ यांचा गड मानला जातो. पण हा गड भेदण्यात सपाला यश आले आहे. गोरखपूरमध्ये भाजप व सपामध्ये जोरदार टक्कर झाली. दोन्ही पक्षांना समान जागा मिळाल्या. तसेच कुशीनगर, देवरिया, गोंडा, आजमगड, अयोध्या, वाराणसी, प्रतापगड, जौनपुर, महाराजगंज, बस्ती, प्रयागराज या भागात सपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. अनेक ठिकाणी सपाला बहुमत मिळाले आहे. या भागात भाजपला 118 जागा मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. पण सपाला 171 जागा मिळाल्या आहेत.

विधानसभेची तयारी

पुढील वर्षी उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांसाठी या निवडणुका महत्वाच्या होत्या. मिनी विधानसभा म्हणून या निवडणुकांकडे पाहिले जात आहे. पण निवडणूक निकालांनी सत्ताधारी भाजपची चिंता वाढवली आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com