धक्कादायक : चीनमध्ये आढळला नवीन कोरोना विषाणू  - Chinese researchers find new corona virus in bats | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : चीनमध्ये आढळला नवीन कोरोना विषाणू 

वृत्तसंस्था
रविवार, 13 जून 2021

चीनमधील संशोधकांनी केलेल्या संशोधनामध्ये हा दावा करण्यात आला आहे.

वॅाशिंग्टन : चीनमध्ये (China) 2019 मध्ये आढळून आलेल्या कोरोना विषाणूचा (Covid-19) प्रसार नेमका कुठून झाला, याचा उलगडा अद्याप झालेला नसताना चीनमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू आढळला आहे. वटवाघूळाच्या (Bats) एका प्रजातीमध्ये आढळलेला या विषाणूची जनुकीय रचना सध्या जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या विषाणूशी मिळतीजुळती असल्याचेही स्पष्ट झाले आहे. (Chinese researchers find new corona virus in bats)

चीनमधील संशोधकांनी केलेल्या संशोधनामध्ये हा दावा करण्यात आला आहे. चीनमधील दक्षिण-पश्चिम भागात करण्यात आलेल्या या संशोधनातून वटवाघूळांमध्ये किती प्रकारचे कोरोना विषाणू आहेत, लोकांमध्ये संसर्ग पसरण्याची त्याची क्षमता याचा अभ्यास करण्यात आला आहे. एका आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिध्द झाले आहे. चीनमधील शंडाँग विद्यापीठातील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. 

हेही वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राम शिंदे यांच्यात गुप्तभेट; राजकीय वर्तुळात खळबळ

संशोधनासाठी मे 2019 ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत वटवाघूळांच्या विविध प्रजातींचे नमुने संकलित करण्यात आले होते. त्यासाठी वटवाघूळांची विष्टा, तोंडातील स्वॅब घेण्यात आले होते. एका प्रजातीमध्ये आढळून आलेले विषाणू सध्या जगभरात अस्तित्वात असलेल्या कोरोना विषाणूशी मिळताजुळता आहे. जुन 2020 मध्ये थायलंडमध्येही असाच विषाणू आढळून आला होता. वटवाघाळूंमध्ये कोरोना विषाणू पसरत असल्याचे यावरून स्पष्ट झालं आहे. काही भागामध्ये याचे प्रमाण अधिक असल्याचेही संशोधनात म्हटलं आहे. 

दरम्यान, 2019 मध्ये चीनमधील वुहान शहरामध्ये कोरोनाचा विषाणू आढळून आल्यानंतर जगभरात तो वेगाने पसरला. भारतासह अनेक देशांमध्ये या विषाणूने धुमाकूळ घातला. हा विषाणू चीनमधील वुहान विषाणू प्रयोगशाळेत तयार करण्यात आल्याचा आरोप अमेरिकेसह अन्य काही देशांनी केला. त्यावरून सध्या वादही सुरू आहे. या स्थितीत चीनमधील वटवाघूळांमध्ये नवीन विषाणू आढळून आला आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) प्रयोगशाळेत हा विषाणू तयार झाला नसल्याचा दावा केला आहे. आता नवीन संशोधनामुळे कोरोना विषाणूचा प्रसार कसा झाला, याचा शोध घेण्याला बळ मिळू शकते. त्यासाठी हे संशोधन महत्वाचे मानले जात आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख