कोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्र्यांवर झालेल्या बॉम्ब हल्ल्याची तुलना पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या हत्याकांडाशी केली आहे. बेअंत सिंह यांच्याही हत्या अशाचप्रकारे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हा हल्ला म्हणजे राजकीय कट असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील निमटीटा रेल्वे स्थानक परिसरात काही अज्ञातांनी राज्यातील मंत्री जाकीर हुसैन यांच्यावर बॉम्ब हल्ला केला. यामध्ये हुसैन गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ममता बॅनर्जी यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Investigation is on. It's big conspiracy. We hope truth comes out. His condition is very critical. His pulse rate dropped to 50. We'll give Rs 5 Lakhs each to those seriously injured & Rs 1 Lakh each to those with minor injuries. Case handed over to CID, STF & CIF: West Bengal CM pic.twitter.com/qRh5fHujkl
— ANI (@ANI) February 18, 2021
ममता म्हणाल्या की, ''जाकीर हुसैन यांच्यावर बॉम्ब हल्ला एका कटाचा भाग आहे. काही लोक आपल्या पक्षात येण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत आहेत. मी त्यांची नावे सांगू शकत नाही. जाकीर हुसैन एक मोठे व्यावसायिक आहेत. त्यांचा विडीचा मोठा कारखाना आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हा एक नियोजित हल्ला होता. या भयानक स्फोटामुळे मी स्तब्ध झाले आहे. हा स्फोट म्हणजे बेअंत सिंह स्फोटासारखा आहे.''
हेही वाचा : मेट्रोमॅन श्रीधरन भाजपच्या वाटेवर...
स्फोटामध्ये गंभीर जखमी झालेल्यांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपये तर किरकोळ जखणी झालेल्यांना एक लाख रुपयांची भरपाई दिली जाणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. स्फोटाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे.
पश्चिम बंगालमधील निवडणुका एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेससह भाजप व अन्य पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. यापार्श्वभूमीवर मंत्र्यांवर बॉम्ब हल्ला झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच गृहमंत्री अमित शहा आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत.
अशी झाली होती बेअंत सिंह यांची हत्या...
बेअंत सिंह हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री आहेत. पंजाब-हरियाणा सचिवालयाच्या बाहेर ते त्यांच्या कारमध्ये बसले होते. तो दिवस ३१ अॉगस्ट १९९५ हा होता. त्याचवेळी त्यांच्यावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात बेअंत सिंह यांच्यासह १८ जणांचा मृत्यू झाला होता. पंजाबमधील दहशतवाद संपविण्यात बेअंत सिंह यांची महत्वाची भूमिका होती.
Edited By Rajanand More

