गौतम अदानींना झटका; कंपन्यांमधील 43 हजार 500 कोटींची गुंतवणूक रडारवर - Blow to Gautam Adani 43,500 crore investment in companies on the radar | Politics Marathi News - Sarkarnama

गौतम अदानींना झटका; कंपन्यांमधील 43 हजार 500 कोटींची गुंतवणूक रडारवर

वृत्तसंस्था
सोमवार, 14 जून 2021

 

आज शेअर बाजारात ही माहिती पसरल्याने खळबळ उडाली.

मुंबई : प्रसिध्द उद्योगपती गौतम अदानी अडचणीत आले आहेत. अदानी ग्रुपमध्ये करण्यात आलेली 43 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ही गुंतवणूक करणाऱ्या तीन बड्या गुंतवणूकदारांची खाती नॅशनल सिक्युरिटीज डिपॅाझिटरी लिमिटेड (NSDL) ने गोठवली आहे. ही बातमी शेअर बाजारात पसरल्यानतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स जवळपास 25 टक्क्यांनी कोसळल्याने अदानींना मोठा झटका बसला आहे. (Blow to Gautam Adani 43,500 crore investment in companies on the radar)

अब्दुला इन्व्हेस्टमेंड फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड या तीन परदेशी फंडांची खाती गोठवण्यात आल्याचे समजते. ही कारवाई 15 दिवसांपूर्वीच झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत आज शेअर बाजारात ही माहिती पसरल्याने खळबळ उडाली. या तीन कंपन्यांची अदानी गुपमध्ये 43 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. मालकी हक्क आणि लाभार्थ्यांची माहिती लपवल्याने या कंपन्यांची खाती गोठवण्यात आल्याने त्यांना शेअरची खरेदी-विक्री करता येणार नाही. 

हेही वाचा : राम मंदीर जमीन घोटाळा; काही मिनिटांत दोन कोटींवरून 18.5 कोटींची झाली जमीन

तीन बड्या गुंतवणूकदारांवर झालेल्या या कारवाईने अदानी यांना मोठा झटका बसला आहे. अदानी यांच्या सहापैकी पाच कंपन्यांच्या शेअरमध्ये आज ऐतिहासिक घसरण झाली. अदानी एंटरप्रयाझेस, अदानी ग्रीन्स, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रांसमिशन आणि अदानी पोर्टस् या कंपन्याच्या शेअरमध्ये मोठी घसरण नोंदविली गेली आहे. हे शेअर्स रेड झोनमध्ये म्हणजे त्याला लोअर सर्किट लावण्यात आले आहे. 

तीन गुंतवणूकदारांवर मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 'एनएसडीएल'कडून या कंपन्यांकडे मालकी हक्काबाबतची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. पण त्याला योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची खाती गोठवली आहेत. अदानी ग्रुपसाठी हे तीन गुंतवणूकदार मोठे असल्याने आता त्यांच्यावरच कारवाई झाल्याने अदानी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख