ज्योतिरादित्य सिंधियांचे राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर! म्हणाले...

राहुल गांधी यांनी काल कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेचे महत्व पटवून देताना सिंधियांच्या भाजप प्रवेशावर थेट हल्ला चढविला.
BJP MP Jyotiraditya Scindia criticise Rahul Gandhis statement that he has become a backbencher in BJP
BJP MP Jyotiraditya Scindia criticise Rahul Gandhis statement that he has become a backbencher in BJP

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना उद्देशून काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते, असे वक्तव्य केले होते. त्यावर सिंधिया यांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मी काँग्रेसमध्ये असताना राहुल गांधी यांनी आता बोलल्याप्रमाणेच काळजी केली असती तर वेगळी स्थिती असती, असे वक्तव्य सिंधिया यांनी केले आहे. 

काँग्रेसच्या यूथ विंगच्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी काल कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेचे महत्व पटवून देताना सिंधियांच्या भाजप प्रवेशावर थेट हल्ला चढविला. ते म्हणाले होते की, सिंधिया यांच्याजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत काम करून संघटनेला अधिक मजबूत करण्याचा पर्याय होता. मी त्यांना म्हणालो होतो की, एक दिवस तुम्ही मुख्यमंत्री व्हाल. काँग्रेसमध्ये असते तर ते मुख्यमंत्री होऊ शकले असते. पण आता ते मागच्या खूर्चीवर बसतात. त्यांनी वेगळी वाट निवडली. आता लिहून घ्या, ते तिथे कधीही मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत. त्यांना त्यासाठी इथेच यावे लागेल," असे वक्तव्य राहुल यांनी केले होते.

या वक्तव्यावर आज सिंधिया यांनी प्रतिक्रिया दिली. याविषयी बोलताना त्यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. मी काँग्रेसमध्ये असतो तर राहुल गांधी यांनी आताप्रमाणेच काळजी केली असती का? असा प्रत्यक्ष सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राहुल गांधी यांना काळजी केली असती तर वेगळी स्थिती झाली असती, असेही ते म्हणाले आहेत.

भाजप नेत्यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी राहुल गांधी यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले, ''जर राहुल गांधी असे करू शकतात तर त्यांनी राजस्थानमध्ये एक प्रयोग करावा. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करावे. जे लोक दोन वर्षांत काँग्रेसला राष्ट्रीय अध्यक्ष देऊ शकले नाहीत, ते मुख्यमंत्री बनविण्याच्या गप्पा मारत आहेत.''

भाजप नेत्याच्या या वक्तव्यामागे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यातील वादाची पार्श्वभूमी आहे. मागील वर्षी सिंधिया यांच्यापाठोपाठ सचिन पायलटही पक्ष सोडण्याच्या विचारात असल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांना पक्षाने उपमुख्यमंत्री पदावरून तडकाफडकी हटवले. पण काही दिवसानंतर पक्षातील वरिष्ठांच्या चर्चेनंतर पायलट यांची नाराजी कमी करण्यात यश आले. 

दरम्यान, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मागील वर्षी मार्च महिन्यात काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सध्या ते राज्यसभा खासदार आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही दिवसांतच मध्य प्रदेशातील काँग्रेसची सत्ता गेली. सिंधिया यांच्या समर्थक आमदारांनी राजीनामा देत भाजपला साथ दिली. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही या आमदारांना यश मिळाले. 

सिंधिया आणि तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यामध्ये विसंवाद निर्माण झाला होता. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून ते नाराज होते. तसेच राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यानंतरही त्यांच्याकडे पक्षाने दुर्लक्ष केल्याचा त्यांचा आरोप होता. सत्तेत त्यांच्या समर्थक आमदारांना डावलले गेले. कमलनाथ यांच्याकडून त्यांना दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचे त्यांचे म्हणणे होते. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com