united states coronavirus spread may increase due to ongoing protest
united states coronavirus spread may increase due to ongoing protest

जागतिक महासत्ता असलेली अमेरिका सापडली दुहेरी संकटात

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेसमोर वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचे संकट आहे. यातून मार्ग काढताना अमेरिकेच्या नाकीनऊ आलेले असताना आता वर्णद्वेषावरुन सुरू झालेल्या आंदोलनाचे लोण सगळीकडे पसरू लागले आहे.

न्यूयॉर्क : जगात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग अमेरिकेत झालेला असून, यामुळे बळी पडणाऱ्या नागरिकांची संख्याही अमेरिकेत अधिक आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी अमेरिका सध्या प्रयत्न करीत आहे. नेमक्या याच वेळी देशभरात वर्णद्वेषावरून आंदोलनाचा भडका उडाला असून, यामुळे कोरोनाचा आणखी प्रसार होण्याची भीती अमेरिका सरकारला वाटत आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी संपूर्ण लॉकडाउन करण्यास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कायम विरोध राहिला आहे. यामुळे मध्यंतरी अमेरिकी सरकारने अर्थचक्राला गती देण्यासाठी निर्बंध मागे घेतले होते. यानंतर नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला दिसले होते. आंदोलनावेळी नागरिक सुरक्षित अंतराचा नियम पाळत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये उत्साहाच्या भरात अप्रत्यक्षपणे विषाणूंचा प्रसार करीत असतो याचे भानही नागरिकांनी ठेवणे गरजेचे आहे, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. 

जॉर्ज फ्लॉइड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत अनेक आंदोलक हे उत्स्फूर्तपणे रस्त्यांवर उतरले आहेत. सध्याच्या या परिस्थितीत आम्हाला घरी बसणे शक्यच नव्हते, अशी प्रतिक्रिया एका महिला आंदोलकानी दिली. अटलांटाच्या महापौरांनी तर म्हटले होते की, तुम्ही काल रात्री आंदोलनासाठी बाहेर पडला असाल तर आज कोरोनाची चाचणी करून घ्यायला हवी. आता कोरोना आणि आंदोलनाचा प्रसार रोखण्याचे आव्हान अमेरिकेसमोर आहे. 

केवळ मास्क लावल्याने कोरोनापासून संरक्षण होणार नाही, असा सावधगिरीचा इशारा अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध विभागाने दिला आहे. आंदोलकांनी मास्क घातले असले तरी त्यांना संसर्ग होणार नाही याची हमी देता येणे शक्य नसल्याचे विभागाने म्हटले आहे. युरोपात पॅरिसमध्ये देखील विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आंदोलनावर बंदी घालण्यात आली आहे. 

हाँगकाँगमध्येही संसर्ग वाढण्याची भीती 

चिनी दडपशाहीच्या विरोधात हाँगकाँगमध्येही आंदोलन सुरू झाल्याने येथेही कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. पॅरिसमध्ये काहीशी अशीच स्थिती आहे. चीन सरकार सोशल डिस्टंसिंगचा मुद्दा पुढे करीत आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप हाँगकाँगमधील लोकशाहीवादी आंदोलकांनी केला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com