Tauktae चक्रीवादळ : गुजरातमध्ये दीड लाख लोकांना हलवलं...23 वर्षांत पहिल्यांदाच भयानक वादळ - Tauktae Cyclone Over 1.5 lakh people shifted from coastal area in gujrat | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

Tauktae चक्रीवादळ : गुजरातमध्ये दीड लाख लोकांना हलवलं...23 वर्षांत पहिल्यांदाच भयानक वादळ

वृत्तसंस्था
सोमवार, 17 मे 2021

आज रात्री 8 ते 11 वाजण्याच्या सुमारास गुजरात किनापट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.

अहमदाबाद : अरबी समुद्रात तयार झालेलं तौते चक्रीवादळ (Tauktae Cyclone) काही तासांतच गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. मात्र, मागील काही तासांपासूनच गुजरातमधील अनेक भागात वेगाचे वारे वाहत असून नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे. या वादळाचा गुजरात सर्वाधिक तडाखा बसणार असल्याने प्रशासनाने आतापर्यंत दीड लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केलं आहे. गुजरातमध्ये मागील 23 वर्षांत पहिल्यांदाच एवढं भयानक वादळ धडकणार आहे. (Tauktae Cyclone Over 1.5 lakh people shifted from coastal area in Gujrat)

तौते चक्रीवादळाने आता रौद्र रुप धारण केलं आहे. हे चक्रीवादळ पुढे सरकत असतानाच अधिक तीव्र होत असल्याने गुजरातचा धोका वाढत चालला आहे. आज रात्री 8 ते 11 वाजण्याच्या सुमारास गुजरात किनापट्टीवर धडकण्याची शक्यता असून अनेक जिल्ह्यांना त्याचा तडाखा बसण्याची भीती व्यक्त केली आहे. तर मुंबई व कोकणात काल रात्रीपासूनच जोरदार वारे वाहत असून अनेक भागात पाऊसही पडत आहे. तसेच काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मुंबईत अनेक भागातील रस्ते जलमय झाले आहेत.

हेही वाचा : लॅाकडाऊनमध्ये दोन मुलींची लग्न सरपंचाला भोवली! पद जाणार अन् लग्नही बेकायदेशीर 

चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा गुजरातला बसणार आहे. पोरबंदर व महुवा किनारपट्टीवर हे वादळ धडकणार असून तिथून पुढे राजस्थानच्या दिशेने सरकेल. त्यावेळी या भागातील वाऱ्याचा वेग ताशी 180 किलोमीटर असण्याची शक्यता आहे. तसेच समुद्रात 3 ते 4 मीटर उंच लाटा उसळू शकतात. वादळाची तीव्रता वाढत असल्याने धोका लक्षात घेऊन प्रशासनाने किनारपट्टी भागातील 655 गावांमधील सुमारे दीड लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. किनारपट्टीलगतची सर्व घरे रिकामी करण्यात आली आहेत. गुजरातमधील 17 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुजरामध्ये NDRF च्या 50 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. 

23 वर्षांपुर्वी 1173 जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये 9 जून 1998 रोजी कच्छ जिल्ह्यात भयानक वादळ आले होते. या वादळामुळे 1173 जणांचा मृत्यू झाला होता. तर 1774 जण बेपत्ता झाले होते. त्यानंतर आता वर्षांनी तौते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत असून हे वादळही मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वादळाची तीव्रता पुढे सरकत असताना वाढतच चालली अधिक रौद्र रुप धारण केले आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यानंतर त्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले. सुरूवातीला या वादळाची तीव्रता कमी होती. पण पुढे सरकत असतानाच वादळाची तीव्रता वाढत चालली असून आता वादळाने रौद्र रुप धारण केले आहे. मागील दोन दिवसांत केरळ, कर्नाटक व गोव्याला वादळाने जोरदार तडाखा दिला आहे. हे वादळ आता महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळून जात आहे. मुंबई, कोकण, ठाणे या भागांसह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दोन दिवसांपासून जोराचे वारे वाहत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. विजेचे खांब पडले असल्याने काही भागातील वीजपुरवठा बंद झाला आहे.

विमानतळ, सी लिंक बंद

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ दुपारी दोनवाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण वादळाची तीव्रता वाढू लागल्याने आता हे विमानतळ सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच सी लिंकही वादळाची तीव्रता कमी होईपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील. दक्षता म्हणून महापालिकेने आज लसीकरण केंद्रही बंद ठेवली आहेत.

Edited By Rajanand More 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख