'आणखी एक घोटाळा...' असं सुचेता दलाल यांचं ट्विट अन् शेअर बाजारात खळबळ

हर्षद मेहता घोटाळा उघडकीस आल्यानंतर सुचेता दलाल प्रकाशझोतात आल्या होत्या.
Sucheta Dalals tweet caused a stir in the stock market
Sucheta Dalals tweet caused a stir in the stock market

मुंबई :  हर्षद मेहताचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर शेअर बाजारात हाहाकार उडाला होता. हा घोटाळा पत्रकार सुचेता दलाल यांनी उघडकीस आणला होता. शनिवारी त्यांनी शेअर बाजारात आणखी एक घोटाळा सुरू असल्याचे संकेत ट्विटवर दिले. या ट्विटनंतर शेअर बाजाराशी संबंधित प्रत्येकाच्या मनात धाकधुक निर्माण झाली व त्याचे परिणाम सोमवारी बाजार सुरू होताच दिसून आले. अनेक शेअर्सच्या किंमती धडाधक कोसळल्याने शेअर बाजारात खळबळ उडाली. (Sucheta Dalals tweet caused a stir in the stock market)

हर्षद मेहता घोटाळा उघडकीस आल्यानंतर सुचेता दलाल प्रकाशझोतात आल्या होत्या. त्यामुळं त्यांनी केलेल्या ट्विटने हर्षद या घोटाळ्याची पुन्हा एकदा चाहूल लागल्याची जाणीव झाली. त्यांनी शनिवारी हे ट्विट केल्यानंतर सोमवारी पहिल्यांदाच बाजार उघडला सेन्सेक्स 350 अंकांनी खाली आला. प्रामुख्याने अदानी ग्रुपमधील पाच कंपन्यांमधील शेअर्स 5 ते 20 टक्क्यांनी घसरले. दलाल यांच्या ट्विटनंतर हा घोटाळा अदानी ग्रुपशी संबंधित असल्याचे समोर आल्यानंतर अदानी ग्रुपला मोठा झटका बसला.

सुचेता दलाल यांनी काय म्हटलंय ट्विटमध्ये?

'आणखी एक घोटाळा जो सिध्द होणं कठीण आहे. सेबीच्या ट्रॅकिंग सिस्टीमकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या बाहेर असलेला हा घोटाळा आहे. एका समूहाच्या मूल्यांत सातत्याने हेराफेरी केली जात आहे. परदेशी कंपन्यांमार्फत हे सुरू आहे. हे याचं वैशिष्टय आहे. काहीच बदललेलं नाही,' असं ट्विट दलाल यांनी केलं आहे. त्यांच्या ट्विटने हर्षद मेहता घोटाळ्याची आठवण करून दिली. 

दरम्यान, प्रसिध्द उद्योगपती गौतम अदानी अडचणीत आले आहेत. अदानी ग्रुपमध्ये करण्यात आलेली 43 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ही गुंतवणूक करणाऱ्या तीन बड्या गुंतवणूकदारांची खाती नॅशनल सिक्युरिटीज डिपॅाझिटरी लिमिटेड (NSDL) ने गोठवली आहे. ही बातमी शेअर बाजारात पसरल्यानतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स जवळपास 25 टक्क्यांनी कोसळल्याने अदानींना मोठा झटका बसला आहे. 

अब्दुला इन्व्हेस्टमेंड फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंड फंड या तीन परदेशी फंडांची खाती गोठवण्यात आल्याचे समजते. ही कारवाई 15 दिवसांपूर्वीच झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत आज शेअर बाजारात ही माहिती पसरल्याने खळबळ उडाली. या तीन कंपन्यांची अदानी गुपमध्ये 43 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. मालकी हक्क आणि लाभार्थ्यांची माहिती लपवल्याने या कंपन्यांची खाती गोठवण्यात आल्याने त्यांना शेअरची खरेदी-विक्री करता येणार नाही. 

तीन बड्या गुंतवणूकदारांवर झालेल्या या कारवाईने अदानी यांना मोठा झटका बसला आहे. अदानी यांच्या सहापैकी पाच कंपन्यांच्या शेअरमध्ये आज ऐतिहासिक घसरण झाली. अदानी एंटरप्रयाझेस, अदानी ग्रीन्स, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रांसमिशन आणि अदानी पोर्टस् या कंपन्याच्या शेअरमध्ये मोठी घसरण नोंदविली गेली आहे. हे शेअर्स रेड झोनमध्ये म्हणजे त्याला लोअर सर्किट लावण्यात आले आहे. 

तीन गुंतवणूकदारांवर मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 'एनएसडीएल'कडून या कंपन्यांकडे मालकी हक्काबाबतची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. पण त्याला योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची खाती गोठवली आहेत. अदानी ग्रुपसाठी हे तीन गुंतवणूकदार मोठे असल्याने आता त्यांच्यावरच कारवाई झाल्याने अदानी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com