रशियात कोरोना ठरतोय डॉक्टरांचा 'काळ'

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना डॉक्टर त्याच्याशी झगडताना दिसत आहेत. रशियात कोरोनाशी दोन हात करणाऱ्या डॉक्टरांना याचा मोठा फटका बसू लागला आहे. यामुळे या संकटाच्या काळात आरोग्यसेवेच्या आरोग्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
russian health system faces major challenge of coronavirus
russian health system faces major challenge of coronavirus

मॉस्को : रशियात साडेतीन लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. यातच चिंतेची बाब म्हणजे, रशियात कोरोना संसर्गामुळे १०१ डॉक्टरांचा बळी गेला आहे. सरकारडून दिल्या गेलेल्या या आकडेवारीबाबत शंका उपस्थित केली जात असून, मृतांचा आकडा यापेक्षा अधिक असू शकतो, असा अंदाज व्यक्त होत आहे.  

कोरोना संसर्गाचा विचार करता जगात रशिया तिसऱ्या स्थानी आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आणि दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आहे. रशियात आतापर्यंत कोरोनाचा ३ लाख ६० हजारहून अधिक नागरिकांना संसर्ग झाला असून, ३ हजार ८०७ जणांचा बळी गेला आहे. सरकारने देशातील मृत्यूदरात घट झाल्याचे म्हटले आहे. सरकारने दिलेल्या या आकडेवारीकडेही साशंकतेने पाहिले जात आहे. राजकीय कारणास्तव सरकार खरे आकडे समोर आणत नसल्याचे देशातील सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात रशियाच्या अधिकाऱ्यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. मृत्यू दरात झालेली घट हे रशियाच्या प्रयत्नांचे फळ असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. 

कोरोनाच्या संसर्गामुळे बळी पडलेलल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी रशियाच्या आरोग्य विभागाकडून ऑनलाइन प्रसिद्ध केली जात आहे. मागील शुक्रवारी आणखी १०१ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नावाचा या यादीत समावेश करण्यात आल्याचे रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. या यादीत ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यात १०१ डॉक्टरांचा समावेश आहे. देशाच्या आरोग्य मंत्रालयाने संसदीय मंत्रालयास मृत आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद ठेवली जात असल्याचे सांगितले होते. परंतु यंदा प्रथमच नावाची यादी आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलीआहे. 

पुतीन म्हणतात, वाईट काळ संपला

रशियातील कोरोना संसर्ग उच्चांकी पातळीवर जाण्याचा कालावधी आता संपला आहे. देशाचा हा वाईट काळ आता इतिहासजमा झाला आहे, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. कोरोनामुळे स्थगित केलेली विजयी संचलन आता पुढील महिन्यात आयोजित करण्याचे आदेश पुतीन यांनी दिले आहे. जर्मनीच्या पराभवाबद्धल हा दिवस साजरा केला जातो आणि या वर्षी या विजयाला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने ९ मे रोजी लाल चौकात मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. परंतु कोरोनामुळे हा कार्यक्रम अखेर स्थगित करण्यात आला होता. आता हे संचलन २४ जूनला होणे अपेक्षित आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com