डिस्को डान्सर...अडीच वर्षात केवळ तीनदा संसदेत मग राजकीय संन्यास अन् आता भाजपात...

बॉलिवूडमध्ये डिस्को डान्सर म्हणून प्रसिध्द असलेले 70 वर्षीय अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.
Mithun Chakraborty joins BJP in west bengal amid assembly election
Mithun Chakraborty joins BJP in west bengal amid assembly election

कोलकता : बॉलिवूडमध्ये डिस्को डान्सर म्हणून प्रसिध्द असलेले 70 वर्षीय अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. पण या लोकप्रिय अभिनेत्याची ही पहिलीच राजकीय भूमिका नाही. यापूर्वीच त्यांनी तृणमूल काँग्रेसमधून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. केवळ अडीच वर्षातच त्यांचा राजकीय प्रवास थांबला.

पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दोन्ही पक्षांकडून अभिनेते, खेळाडू, लोकप्रिय चेहऱ्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चढाओढ लागली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतीच मुंबईतील घरी जाऊन मिथून चक्रवर्ती यांची भेट घेतली होती. तेव्हाच मिथून यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले होते. आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या मंचावर जाऊन भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. 

पहिल्यांदा तृणमूलचे खासदार...

ममता बॅनर्जी यांनी 2011 मध्ये 34 वर्षांचा डाव्या पक्षांचा गड उध्वस्त करत राज्यात तृणमूलची सत्ता आणली. यावेळी बंगालमध्ये ममतादीदींची लोकप्रियता खूप वाढली होती. सत्तेत आल्यानंतर ममतांनी मिथून चक्रवर्ती यांना राजकारणात येण्याचे आमंत्रण दिले. ममतादीदींची लोकप्रियता पाहून मिथून यांनी हे आमंत्रण स्वीकारत राजकारणात प्रवेश केला. त्यांना लगेच राज्यसभेचे तिकीटही मिळाले. तृणमूलकडून राज्यसभा खासदार म्हणून ते निवडून गेले. पण केवळ अडीच वर्ष ते खासदार राहिले. या अडीच वर्षांच्या काळात केवळ तीन दिवस ते संसदेत उपस्थित होते. 

चिटफंड घोटाळ्यात नाव

मिथून चक्रवर्ती यांच्या राजकीय कारकीर्दीला शारदा चिटफंड घोटाळ्याने ब्रेक लावला. 2015-16 मध्ये या घोटाळ्यात मिथून यांचेही नाव आले. त्यामुळे डिसेंबर 2016 मध्ये त्यांना राज्यसभेचा राजीनामा द्यावा लागला. त्यांनंतर त्यांनी स्वत:ला राजकारणापासून दुरच ठेवले. मिथून हे शारदा कंपनीचे ब्रँड अॅम्बॅसेडर होते. ईडी ने या घोटाळ्यात त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांनी 1 कोटी 20 लाख रुपये कंपनीला परतही दिले. या घोटाळ्याचा हिस्सा बनू इच्छित नाही, असे त्यावेळी ते म्हणाले होते.

डाव्या विचारसरणीशी जोडलेले

मिथून चक्रवर्ती यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण डाव्यांची सत्ता असताना त्यांना डाव्यांचे जवळचे मानले जात होते. तत्कालीन क्रीडा मंत्री सुभाष च्रकवर्ती यांच्या ते जवळचे असल्याची चर्चा होती. तरूण असताना त्यांनी आपण डाव्या विचारसरणीचे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे ममतादीदींच्या सोबत गेल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटले होते. आता भाजपमध्ये जात त्यांनी पून्हा धक्का दिला आहे. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com