डोनाल्ड ट्रम्प यांचे 'हे' पाऊल ठरेल भारतासाठी फायद्याचे

जगातील आघाडीच्या सात आर्थिक महासत्तांची संघटना असलेल्या 'जी-७' ची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केला आहे. या संघटनेत भारताचा समावेश होण्याची शक्यता यामुळे बळावली आहे.
donald trump wants to expand G7 organization
donald trump wants to expand G7 organization

न्यूयॉर्क :  'जी-७' या संघटनेचे स्वरूप भविष्यात हे 'जी-१०' किंवा 'जी-११' असे होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांनी संघटनेत फार मोठे फेरबदल करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. यामुळे या संघटनेची रचना बदलण्याची शक्यता आहे. या संघटनेत भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि रशिया या देशांचा समावेश व्हावा, अशी मागणी ट्रम्प यांच्याकडून होत आहे. 

सुरवातीला १९७३ मध्ये 'जी-७' या संघटनेचे स्वरूप 'जी-४' असे होते. नंतर कालानुरूप तिचा विस्तार करण्यात आला. येत्या सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेचे संमेलन होणार असून, त्यावेळी या संघटनेचेही संमेलन होण्याची शक्यता आहे. आता देखील या संघटनेचे संमेलन रद्द करताना ट्रम्प यांनी म्हटले आहे की, या संघटनेचे संमेलन मी तात्पुरते पुढे ढकलत आहे, सध्या ही संघटना सगळ्या जगाचे प्रतिनिधित्व करीत असल्याचे मला तरी दिसत नाही. हा काही देशांचा समूह आता कालबाह्य झाला आहे. 

कॅम्प डेव्हिड येथे याच महिन्यात होऊ घातलेले या संघटनेचे संमेलन रद्द करताना ट्रम्प यांनी रचनात्मक फेरमांडणीचा संकल्प बोलून दाखविला होता. 'जी-७' या संघटनेची विद्यमान रचना कालबाह्य झाली असून, त्यात बदल आवश्यक असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. चालू आठवड्यातच ट्रम्प यांनी संमेलनाच्या अनुषंगाने सदस्य देशांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी कोरोनाच्या संसर्गामुळे व्हर्च्युअल संमेलन घेण्याचा प्रस्ताव मांडला होता आणि या संमेलनाचे यजमानपद स्वतःकडे घेतले होते. यावर भडकलेल्या जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल या बैठकीतून बाहेर पडल्या होत्या. सध्या जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अन्य सदस्य देशांनी या संमेलनाला विरोध केला आहे . 

रशियाच्या समावेशासाठी ट्रम्प प्रयत्नशील 

संघटनेच्या नव्या रचनेत रशियाला स्थान मिळण्याची अधिक शक्यता आहे. रशिया या आधीही संघटनेचा सदस्य होता. क्रिमियावर केलेल्या आक्रमणानंतर २०१४ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी रशियाची संघटनेतून हकालपट्टी केली होती. मात्र, आता रशियाला पुन्हा संघटनेत स्थान मिळावे, यासाठी ट्रम्प प्रयत्न करीत आहेत. भारत, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रलिया या देशांचाही या संघटनेत समावेश होऊ शकतो. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com