कॉंग्रेसशी द्रोह करणाऱ्या आमदारांसाठीही ‘झिरो ट्रॅफिक’ची व्यवस्था केली होती का?

सदस्यांनी एकच गदारोळ घातला.
Confusion in the Karnataka Legislative Council over the issue of 'Zero Traffic
Confusion in the Karnataka Legislative Council over the issue of 'Zero Traffic

बंगळूर : शशिकला जोल्ले यांना शपथग्रहणाच्या वेळी राजभवनला येण्यासाठी व पक्षांतर केलेल्या आमदारांना राजीनामा देऊन जाण्यासाठी बंगळूर शहरात झिरो ट्रॅफिक व्यवस्था करण्यात आल्याचा विषय आज विधान परिषदेत गाजला. यावरून सत्ताधारी भाजप व कॉंग्रेस सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप, शाब्दीक चकमक होऊन सभागृहात एकच गोंधळ झाला. (Confusion in the Karnataka Legislative Council over the issue of 'Zero Traffic')

कॉंग्रेसचे सदस्य नारायणस्वामी यांच्या प्रश्नाला गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी उत्तर दिले. नूतन मंत्री शशिकला जोल्ले यांना शपथ घेण्यासाठी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून राजभवनपर्यंत शून्य रहदारीची व सिग्नल फ्री व्यवस्था करण्यात आली होती, असे त्यांनी गुरुवारी विधान परिषदेत स्पष्ट केले. मंत्र्यांना मागे-पुढे सुरक्षा जीप देण्यात येत नाही. जर असेल तर सांगा, ती कमी करण्यात येईल. पोलिस विभागात शून्य रहदारी नाही, मान्यवरांना तशी व्यवस्था करण्यात येते. मी आणि मुख्यमंत्र्यांनी झिरो ट्रॅफिक व्यवस्था स्वीकारलेली नाही. पोलिसांना वाहतूक व्यवस्थेची माहिती आहे. मान्यवरांना सिग्नल फ्री व्यवस्थेतून आणण्यात येते. त्यांना शून्य रहदारीची आवश्यकता नाही, असे ते म्हणाले.

शशिकला जोल्ले यांना राजभवनातून फोन आला, त्यांनी अधिकाऱ्यांना माहिती देऊन काही करू शकता का, असे विचारले. त्याशिवाय त्यांच्यासाठी कोणतीही झिरो ट्रॅफिक व्यवस्था करण्यात आली नाही, परंतु त्यांना सिग्नल मुक्त करून आणण्यात आले आहे, अशी मला माहिती मिळाली आहे. प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे मला जास्त चर्चा नको आहे. निकालानंतर मी प्रस्ताव देईन, असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

यावेळी नारायणस्वामी यांनी उपप्रश्न विचारताना, आमच्या पक्षाशी द्रोह करून काही आमदारांना राजीनामा देऊन जाण्यासही झिरो ट्रॅफिक व्यवस्था करण्यात आली होती, असे सांगताच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी एकच गदारोळ घातला. कायदा मंत्री मधुस्वामीही संतापले. ते म्हणाले की, विश्वासघात, विष, द्रोह असे शब्द वापरू नये, कोणीही तसे लिहून दिलेले नाही.

तुमच्या पक्षातील अनेक सदस्यांनी विश्वासघात केला आहे. यावरून कॉंग्रेस व भाजप सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. भाजप सदस्यांनी मंत्र्याच्या मदतीला धाव घेतली आणि काँग्रेस सदस्यांचा निषेध केला. विश्वासघात हा शब्द फाईलमधून काढून टाकावा, अशी मागणी केली. गोंधळ सुरू होताच अध्यक्षांनी सभागृहात दुसरा विषय घेऊन, या विषयावर कोणाला बोलू न देता सभागृहाला शांत केले.

प्रकरण उच्च न्यायालयात

शशिकला जोल्ले यांनी शपथग्रहण समारंभात भाग घेण्यासाठी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून राजभवनापर्यंत ‘शून्य रहदारी’ची व्यवस्था केली होती, अशी याचिका ४ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने, सरकार आणि शशिकला जोल्ले यांना नोटीस बजावली आहे. वकील जी. बालाजी नायडू यांच्या जनहित याचिकेची मुख्य न्यायाधीश ए. एस. ओक यांच्या विभागीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. काही काळ युक्तिवाद करणाऱ्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना मंत्री शशिकला जोल्ले, सरकारचे मुख्य सचिव, राज्य पोलिस महासंचालक, एडीजीपी (पोलिस मुख्यालय), शहर पोलिस आयुक्त आणि शहर वाहतूक विभागाचे अतिरिक्त आयुक्त यांना नोटीस बजावली. आमदारांसाठी शून्य वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय कोणी घेतला? हे मंजूर झाल्यास हा कायदा सर्व आमदारांना आवश्यक असू शकतो. जिवंत हृदय प्रत्यारोपणासारखी कारणे असल्यास शून्य रहदारी न्याय्य ठरू शकते. आमदारांना अशी आणीबाणी काय होती? असा प्रश्न करून उच्च न्यायालयाने सुनावणी २२ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली.

राज्यपालांना झिरो ट्रॅफिक

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत बुधवारी (ता. १५ सप्टेंबर) आदिचुंचनगिरी येथून राष्ट्रीय महामार्ग- ७५ मार्गे शून्य रहदारीद्वारे बंगळूरला आले. राज्यपाल नेलमंगल ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येताच त्यांना शून्य वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती. नेलमंगल शहरातील टाऊन पोलिसांनी व नंतर मादनायकनहळ्ळी पोलिसांनी संपूर्ण सुरक्षा पुरविली. राष्ट्रीय महामार्ग-७५ वरील सर्व्हिस रोडवर यामुळे अर्ध्या तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com