विश्वास पाटलांना पाठीशी घालताना सरकारला लाज वाटत नाही का? : श्रीपाल सबनीस 

माजी संमेलनाध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी सलग दोन दिवस विश्वास पाटील यांना लक्ष्य केले आहे. त्यासाठी त्यांनी कठोर शब्द वापरले आहेत. अर्थात या निमित्ताने सबनीस हे जुने उट्टे काढत असल्याचे सांगण्यात येते.
विश्वास पाटलांना पाठीशी घालताना सरकारला लाज वाटत नाही का? : श्रीपाल सबनीस 

पुणे : माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस हे सगल दोन दिवस "पानिपत'कार व माजी सनदी अधिकारी विश्‍वास पाटील यांना जाहीररित्या झोडपून काढत आहेत. या दोघांतील जुना वाद यामुळे आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

"झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना विश्वास पाटील यांनी भ्रष्टाचार केला. त्याला बिल्डर, पुढारी आणि अन्य सरकारही जबाबदारी आहे. विश्वास पाटील यांच्यासारख्या नालायक लेखकाला पाठीशी घालताना सरकारला लाज वाटत नाही का,'' अशी सवाल सबनीस यांनी केला. 

पुण्यात काल व आज (ता. 18 जून) रोजी झालेल्या दोन कार्यक्रमांत सबनीस यांनी विश्‍वास पाटील यांचा विषय उपस्थित केला. 

फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचाच्या वतीने दलित पॅंथरचे यशवंत नडगम यांना 'लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार' देऊन सोमवारी (ता. 17) गौरविण्यात आले. दादासाहेब सोनवणे, प्रा. विलास वाघ, आर. के. लोंढे, विठ्ठल गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी बोलताना पाटील हे मराठी साहित्याला कलंक असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. ते याबाबत मोजके बोलले. पण शेलक्‍या शब्दांत पाटील यांना लक्ष्य केले. त्यांना पाठीशी घालतना सरकराला लाज वाटत नाही का, असा सवालही उपस्थित केला. 

त्यानंतर आज (18 जून) रोजी पुण्यात दुसरा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रमही अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आला होता. झोपडपट्टी सुरक्षा दल, दलित विकास आघाडी व कामगार सुरक्षा दलातर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त "संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मराठी राज्याचा उद्देश सफल झाला आहे का " या विषयावर महाचर्चा घेण्यात आली. 

यावेळी साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा, भा.ल.ठाणगे, शिवाजी जवळकर उपस्थित होते. यावेळी सुदाम पवार, गायक मिलिंद शिंदे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. त्या वेळी केलेल्या भाषणात सबनीस यांनी पाटलांचा विषय काढलाच. 

"निवृत्त होण्याआधी केवळ चार पाच दिवसांत तब्बल 450 फाईली निकालात काढण्याची 'कार्यक्षम' कामगिरी आणि 'गतिमानता' दाखवणाऱ्या विश्वास पाटील यांच्याएवढी कार्यक्षमता मी कुठेही पाहिलेली नाही, असा टोला त्यांनी लगावला. विश्वास पाटील यांच्यासारखे लेखक मराठी साहित्य विश्वाला आणि मराठी संस्कृतीला कलंक आहेत, असेही सबनीस म्हणाले. 

सबनीस यांनी काढले जुने उट्टे 
सबनीस व पाटील यांच्यातील वाद हा आत्ताचा नाही. सबनीस हे पिंपरी येथील संमेलनाचे अध्यक्ष बनल्यानंतर पाटील यांनी त्यांच्या निवडीबद्दल पोलिसांकडे तक्रार केली होती. निवडणुकीत गैरप्रकार करून सबनीस विजयी झाल्याचा पाटील यांनी आरोप केला होता. सबनीस यांच्यासह साहित्य महामंडळाच्या तत्कालीन अध्यक्षा माधुरी वैद्य आणि निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांच्यावरही पाटील यांनी आरोप केला होता. आता पाटील हे "एसआरए' प्रकरणाच्या चौकशीत अडकल्याने सबनीस यांना जुने उट्टे काढण्याची संधी मिळाली. त्यामुळे सबनीस यांनी पाटिल यांच्यावर सध्या टीकास्त्र चालविले आहे. 

...............

वाचा आधीच्या बातम्या- विक्रोळी एसआरए प्रकरणात विश्वास पाटलांची चौकशी http://www.sarkarnama.in/vikroli-sra-project-trouble-13618

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com