दत्तू भोकनाळची रस्त्यावर उतरून समाजसेवा; चार तासांत केले गावाचे निर्जंतुकीकरण - Rowing Champion Dattu Boknal Sprayed Disinfectants in Village at Nashik District | Politics Marathi News - Sarkarnama

दत्तू भोकनाळची रस्त्यावर उतरून समाजसेवा; चार तासांत केले गावाचे निर्जंतुकीकरण

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 एप्रिल 2020

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी काही खेळाडू निधी देत आहेत, तर कोणी जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करत आहेत, परंतु आशियाई सुवर्णपदक विजेता रोईंगपटू दत्तू भोकनाळ रस्त्यावर उतरून समाजसेवा करत आहे.

मुंबई : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी काही खेळाडू निधी देत आहेत, तर कोणी जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करत आहेत, परंतु आशियाई सुवर्णपदक विजेता रोईंगपटू दत्तू भोकनाळ रस्त्यावर उतरून समाजसेवा करत आहे. नाशिकमधील आपले गाव त्याने स्वतःहून निर्जंतुक केले आहे.

29 वर्षीय दत्तूने चांदवड तहसील येथील तळेगाव रुही या आपल्या गावात स्वतःहून सॅनिटाईझचा स्प्रे केला. रविवारी त्याने ही मोहीम पूर्ण केली आणि त्यासाठी त्याला चार तास लागले. माझे कुटुंब आणि मित्र मिळून आम्ही आपले पूर्ण गाव निर्जंतुक करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीही केली, असे दत्तूने आपल्या गावाहून वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. दत्तूच्या गावाची लोकसंख्या 12 हजारांची आहे.

मुंबई, पुण्याच्या तुलनेत कोरोनाचा प्रादुर्भाव नाशिकमध्ये आटोक्‍यात आहे. दत्तूचे गावही यापासून दूर आहे. महाराष्ट्रात मात्र कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जेथे प्रादुर्भाव नाही, तेथेही चिंतेचे वातावरण आहे. देशभर लॉकडाऊन झाले, त्याच्या अगोदरच दत्तू आपल्या गावातच होता. आता तर हे लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आले आहे.

असे केले निर्जंतुकीकरण

आपला परिसर या व्हायरसपासून मुक्त ठेवण्यासाठी गरज आहे ती निर्जंतुकीकरण करण्याची. उदाहरण द्यायचे तर आपण जेव्हा डॉक्‍टरांच्या क्‍लिनिकमध्ये जातो तेव्हा दरवाजा, हॅंडलसह अनेक वस्तूंना आपला स्पर्श होत असतो. त्यामुळे अशा क्‍लिनिकसह इतर जागांचेही निर्जंतुकीकरणाची गरज आम्हाला पटली आणि त्यानुसार आम्ही हे कार्य केले.

शेतीच्या वस्तूंचा वापर

प्रतिकूल परिस्थितीत नेहमीच झगडणाऱ्या दत्तूने या कार्यासाठी कोण मदत करेल, याची वाट पाहिली नाही. निर्जंतुकीकरणाच्या औषधाचा फवारा करण्यासाठी त्याने शेतीकामासाठी घरात असलेल्या फवारणी मशीनचा वापर केला. जेथे जास्त प्रमाणात लोक असतात, त्या सरकारी रुग्णालय, ग्रामपंचायत कार्यालय अशा ठिकाणांचे आम्ही वारंवार निर्जंतुकीकरण करत असतो. या वेळी आम्ही मेडिकल दुकाने, देवळे आणि भाजीपाला मार्केटमध्येही ही मोहीम राबवली, अशी माहिती दत्तूने दिली. आठवड्यातून दोनदा आम्ही असे करणार असल्याचे त्याने सांगितले.

हे देखिल वाचा - रुग्ण म्हणून आला आणि कोरोनाला हरवणारा योद्धा म्हणून परतला....नाशिक : 'कोरोना'चा संसर्ग झालेला नाशिकचा पहिला रुग्ण आज खडखडीत बरा होऊन घरी परतला. जिल्हा शासकीय रुग्णालयात तो आला 'कोरोना'ग्रस्त म्हणून. मात्र चौदा दिवसांच्या यशस्वी उपचारातून त्याने जगाला हादरवणाऱ्या कोरोना विषाणूला पराभूत केले. रुग्णालयातून तो बाहेर पडला तेव्हा रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी वॉर्ड ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत मानवी साखळी केली. 'कोरोना'ला पराभूत केलेला 'तो' अगदी योद्धयाच्या थाटात बाहेर पडला.   

सविस्तर बातमी येथे वाचा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख